शरद पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना भाजपचे इनाम? दिली मोठी जबाबदारी


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील टीकेमुळे काही महिन्यापूर्वी भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेचे आमदार झालेल्या गोपीचंद पडळकरांना पक्षाकडून इनाम दिल्याचे एका प्रकारे स्पष्ट होत आहे. कारण त्यांना भाजपने आज थेट पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे.

भाजपचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये लोकसभेनंतर भाजपमध्ये प्रवेश करणारे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना देखील पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्तेपद देण्यात आले आहे. तर गेल्या महिन्यातच केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण आज 10 प्रवक्ते व 33 पॅनल सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

शरद पवारांना महाराष्ट्राला झालेला कोरोना, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर पवारांनीच कोण पडळकर, डिपॉझिटही वाचवू न शकलेला, असे संबोधत या वादावर पडदा टाकला होता. अजित पवार यांच्या विरोधात पडळकरांनी बारामतीमधून भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अखेर माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांची विधान परिषदेत आमदार म्हणून वर्णी लावली.

अशी आहे भाजपची समिती
मुख्य प्रवक्ता – केशव उपाध्ये
प्रवक्ता – खा.भारती पवार – उत्तर महाराष्ट्र, आ‍.गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र, आ. राम कदम – मुंबई, शिवराय कुलकर्णी – विदर्भ, एजाज देखमुख – मराठवाडा, भालचंद्र शिरसाट – मुंबई, धनंजय महाडीक – प. महाराष्ट्र, राम कुलकर्णी – मराठवाडा, श्वेता शालिनी – पुणे, अॅड. राहुल नार्वेकर – मुंबई.

त्याचबरोबर पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सदस्य – गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी यांचा समावेश आहे.