…अन् चक्क निलेश राणेंनी मानले रोहित पवारांचे आभार


मुंबई: राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटाने सर्वसामान्यांसह सेलिब्रेटी तसेच राजकारण्यांना देखील आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यातच आता सिंधुदुर्गचे माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांना देखील कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती निलेश राणे यांनी स्वत: ट्विट करून दिली. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यामुळे आपण कोरोनाची चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे.

याच दरम्यान निलेश राणेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. निलेश राणेजी, लवकर बरे व्हा, सर्वांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत, असे निलेश राणे यांना रोहित पवार यांनी सांगितले. यानंतर निलेश राणे यांनी देखील ट्विटर द्वारे त्यांचे आभार मानले आहेत.