चिनी ‘अलिबाबा’साठी कायमची बंद होणार अमेरिकेची गुहा


वॉशिंग्टन: भारतातील मोदी सरकारने चिनी मोबाईल अॅपवर बंदी घालत चिनी ड्रॅगनला जसा चिरडण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रकारे अमेरिकेने देखील चीनविरोधात सायबर स्ट्राईक करत दणका द्यायला सुरुवात केली आहे. चीनच्या टीक-टॉक आणि वुई चॅटसोबत कोणतेही व्यवहार करण्यास अमेरिकेने बंदी घातली. या पाठोपाठ अलिबाबा (alibaba) या चीनच्या ई-कॉमर्स कंपनीवर बंदी घालण्याच्या तयारीत अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन आहे.

टीक-टॉकसह अनेक लोकप्रिय अॅप तयार करणाऱ्या बाइटडान्स (bytedance) या चिनी कंपनीला अमेरिकेतील त्यांच्या मालकी हक्कांपैकी किमान ९० टक्के हक्क अमेरिकेतील एखाद्या कंपनीला विकले तर कारभार सुरू ठेवता येईल. अन्यथा अमेरिकेतील बाइटडान्स कंपनीच्या व्यवहारांवर कायमची बंदी लागेल, अशा स्वरुपाचा आदेश अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला आहे. ट्रम्प यांनी ही कारवाई देशाच्या सुरक्षेचे कारण पुढे करत केली. याआधी भारतात टीक-टॉक, वुई चॅट, शेअर इटसारख्या अनेक चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली. बाइटडान्स कंपनीचे भारताच्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातनंतर आता अमेरिकेनेही कारवाई केल्यामुळे बाइटडान्स कंपनी आणखी अडचणीत सापडली आहे.

बाइटडान्स कंपनीला मालकी हक्क विकण्याची अट घालण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी १४ ऑगस्ट रोजी एका आदेशावर सही केली. त्यांनी या आदेशात बाइटडान्समुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे कारण दिले आहे. याआधी देशाच्या सुरक्षेसाठी चिनी अॅप कंपन्या तसेच ई-कॉमर्स आणि सायबर क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी दिले होते.

अमेरिकेतील नागरिकांची वैयक्तिक माहिती चिनी अॅप स्वतःच्या आर्थिक लाभासाठी वापरत आहेत. चीन या माहितीचा गैरवापर करुन अमेरिकेतील नागरिकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत ट्रम्प प्रशासनाने चिनी कंपन्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. भारताने याआधी देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत चिनी अॅपवर बंदी घालण्याचे पाऊल उचलले होते.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे बाइटडान्ससह अनेक बलाढ्य चिनी कंपन्यांवर वर्चस्व आहे. व्यवसायाच्या निमित्ताने या कंपन्या जगभर चीनचा प्रभाव निर्माण करत आहेत. चिनी कंपन्या हा प्रभाव निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करतात. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या चिनी कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचे ट्रम्प प्रशासनाने जाहीर केले.

अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव मागील काही महिन्यांपासून वाढला आहे. चीनला कोरोनासाठी ट्रम्प प्रशासनाने कारणीभूत ठरवले आहे. तसेच अमेरिकेने चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी आशिया खंडात तसेच आशियाजवळ जास्तीत जास्त सैन्य नियुक्ती करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने अलिकडेच तैवानला शस्त्रांची मोठी मदत देण्याचा निर्णय घेतला, तसेच हाँगकाँगमध्ये चीन करत असलेल्या कारवायांचा विरोध म्हणून अमेरिकेने हाँगकाँगसोबतचा मुक्त व्यापार करार रद्द केला आहे.