जागतिक क्रिकेट हेलीकॉप्टर शॉट मिस करेल; अमित शहांच्या धोनीला पुढील वाटचालीस शुभेच्छा


मुंबई – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतीय संघाचा सर्वाधिक यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जुलै 2019 पासून सुरू होत्या. त्यातच धोनीने शनिवारी अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला.

भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून देणाऱ्या धोनीने अशी अचानक घेतलेली निवृत्ती अनेकांना पटलेली नाही. त्यात त्याला अप्रत्यक्षपणे बीसीसीआयने देखील निवृत्तीचे संकेत दिलेले असल्यामुळे त्यांना कळवण्याआधीच धोनीने आपल्या चाहत्यांना याबाबत थेट कळवणे पसंत केले. जगभरातील चाहत्यांनी धोनीच्या निवृत्तीनंतर नाराजी व्यक्त करताना, धोनीच्या आठवणी जागवल्या आहेत. त्याचबरोबर धोनीच्या कारकिर्दीचे राजकीय नेत्यांनीही कौतुक केले आहे.

त्यातच धोनीच्या उत्कृष्ट खेळीचे कौतुक करत माहीला पुढील आयुष्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर माही, जागतिक क्रिकेट हेलीकॉप्टर शॉट मिस करेल, असेही शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आपल्या हटके शैलीने लक्षावधी क्रिकेट चाहत्यांना धोनीने मंत्रमुग्ध केले आहे. धोनी यापुढेही भारतीय क्रिकेटला मजबूत करण्यासाठी आपले योगदान देईल, त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा… असे म्हणत शहा यांनी धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची आठवणही केली.

Loading RSS Feed