अविनाश जाधव यांच्या विधानाला प्रताप सरनाईक आणि राजन विचारे यांचे प्रत्युत्तर


मुंबई: ठाण्यात सध्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची अटक आणि सुटका या प्रकरणावरुन शिवसेना विरुद्ध मनसे असा वाद रंगला असून अविनाश जाधव यांनी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा मी आदर करतो, कोणत्या शिवसैनिकाला उचलणे हा माझा धंदा नाही. बाळासाहेबांच्या मुशीतले आम्ही सगळे आहोत, तशी राजसाहेबांची आम्हाला शिकवण असल्यामुळे शिवसैनिकांबद्दल मनात प्रचंड नितांत आदर आहे. मी म्हटले होते जे आम्हाला त्रास देतात ते तुम्ही आम्हाला त्रास देता आहात का असा अर्थ होतो. जे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल झाले त्याबद्दल ते का नाही बोलले? असा सवाल केला.

त्याचबरोबर जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा त्रास देणाऱ्यांना असेच उचलून नेऊ हे विधान होते, कोणाला उचलून न्यायचे की नाही न्यायचे, तर तो शिवसैनिक आहे. मला शिवसैनिकांचा नितांत आदर आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ. आज अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, जे राजसाहेबांचा आदर करतात. शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असे म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावे, आम्ही वाट पाहत आहोत, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शिवेसनेला दिला होता. आता त्यांच्या इशाऱ्याला शिवसेनेने उत्तर दिले आहे.

अविनाश जाधव यांच्यावर शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी एक व्हडिओ बनवून निशाणा साधला आहे. प्रताप सरनाईक म्हणाले की, अविनाश जाधव, तुझा काल व्हिडिओ पाहिला. तुझा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तुझ्यावर खूप दया आली. आंदोलन करण्याची जेव्हा भूमिका घेतो तेव्हा मलाही वाटते की सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी तू लढत आहेस. परंतु गेल्या वर्षाभरामध्ये बघितले, तर ज्या पद्धतीने तु जेव्हा सर्वांनी दहिहंडीचा उत्सव रद्द केला असताना जाणीवपूर्वक तू दहिहंडीचे आयोजन करतो. कधी कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो. तर कधी भाजपच्या नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो. तसेच जाणीवपूर्वक तु ठाण्यातील गेल्या अनेक वर्षापासून शांत असलेले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी अविनाश जाधव यांच्यावर केला आहे.

तु आयपीएस, आयईएस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतो, ते योग्य नाही. आपल्याला लोकशाहीत काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य दिले असले म्हणून कोणाताही प्रकारचा गैरवापर करायचा आणि लोकांची सहानभूती मिळवायची हे योग्य नाही. ठाणे आणि पालघर जिल्हयासाठी शिवसेनेने जे काही केले आहे, तो इतिहास असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच तु बोलतोस की आम्ही देखील घरातून उचलून घेऊन जाऊ. घरात येऊन उचलून जायला आम्ही काही चिल्लर आहोत का असा सावल उपस्थित करत एका आमच्या साध्या कार्यकर्त्याला उचलून घेऊन जायची हिंमत दाखव, असे थेट आवाहन प्रताप सरनाईक यांनी अविनाश जाधव यांना दिले आहे.

एका रात्रीत आणि केवळ व्हिडओ बाईट देऊन कोणी नेता बनत नाही, उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ, प्रत्येक जण कतृत्वाने मोठो होत असतो. डावखरे यांनी देखील किती वर्ष काम केले आहे, त्यातूनच ते आमदार आणि सभापती झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हे एक शाखा प्रमुख होते, पुढे नगरसेवक, सभागृह नेता, आमदार झाले. त्यानंतर मंत्री पालकमंत्री, विरोधी पक्ष नेता झाले, एवढी सर्व पदे असूनही मागील २५ ते ३० वर्षे ते ठाणे शहरात काम करीत आहेत. कार्यकर्ता असाच घडत नसतो, सकाळी व्हिडीओ करायचा टीका करायची आणि सोडून द्यायची अशी टीका शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी अविनाश जाधव यांच्यावर केली.

त्याचबरोबर तुम्ही आजवर केवळ टीका करण्याशिवाय काय केले, या आव्हानाच्या गोष्टी आमच्या सारख्यांना तुम्ही सांगून नका, आमच्यातील शिवसैनिक अजूनही जागा आहे. आम्ही कोणत्याही पदावर असलो तरी आमचे शिवसेनेचे जे पद आहे, तो शिवसैनिक असतो. घरातून उचलून नेन्याची धमकी आम्हाला देऊ नका, आम्ही काय लहान मुल नाही, तुम्ही तुमच्या औकातीत रहा आणि निमुटपणे पक्षाचे काम करा, चांगली कामे असतील, तर आम्ही सहकार्य करु, पण अशी टीका, आव्हान देणार असाल तर तुम्ही आमच्या नादीसुद्धा लागू नका, असा इशाराही राजन विचारे यांनी दिला होता.

दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अविनाश जाधव यांच्या मागे सर्व महाराष्ट्र सैनिक खंभीरपणे उभे असल्याचे म्हणत अविनाश जाधव यांच्या एका विधानानंतर ठाण्यातील काही उंदीर बाहेर येत असल्याचा टोला देखील लगावला आहे.