नारायण राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या आपले नातू पार्थ पवार यांना फटकारले होते. पण आता पार्थ पवार यांची भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी पाठराखण केली आहे. पार्थ १८ वर्षांचा आहे आणि परिपक्व आहे. त्याचबरोबर त्याने लोकसभा निवडणूक लढवल्याची भूमिका राणे यांनी मांडली.

रविवारी प्रसारमाध्यमांशी नारायण राणे यांनी संवाद साधला. त्यांनी यावेळी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणासह पार्थ पवार यांच्याबद्दल भाष्य केले. खासदार राणे पार्थ पवार यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, पार्थ पवार १८ वर्षांचा असून तो राजकारणात आहे. त्याशिवाय त्याने निवडणुकही लढवली असल्यामुळे त्याला अपरिपक्व म्हणत येणार नाही. पार्थने केलेल्या मागणी मागे त्याचे स्वतःचे म्हणून काही विचार असतील. त्यामुळेच त्याने हे विधान केले असेल, असे म्हणत राणे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली.