गणेशोत्सव स्पेशल ट्रेन्सकडे चाकरमान्यांनी फिरवली पाठ; 18 डब्यांच्या ट्रेनने फक्त 30 प्रवाशांचा प्रवास


रत्नागिरी : मध्य रेल्वेने कालपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 162 ट्रेन सोडण्याचे नियोजन केले असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून यातील काही ट्रेन ह्या सुटणार आहेत. त्यानुसार काल रात्री साडे आठ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरीला जाणारी पहिली ट्रेन सुटली. या पूर्ण रेल्वेत फक्त 6 प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बसले तर ठाणे आणि पनवेल येथून 25 प्रवाशांनीच आरक्षण केले होते. म्हणजेच 18 डब्यांच्या या गाडीत काल फक्त 30 प्रवाशीच प्रवास करत होते.

गणेशोत्सवाकरता कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन्स सोडण्याची घोषणा झाल्यानंतर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. पण या ट्रेन्सकडे चाकरमान्यांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काल रत्नागिरीसाठी निघालेली पहिली ट्रेन कुर्ला – रत्नागिरी ज्यात रत्नागिरीला केवळ 11 प्रवाशी उतरले. दुसरी ट्रेन CSMT – सावंतवाडी ज्यातून रत्नागिरीत केवळ 14 प्रवाशी उतरले तर तिसरी ट्रेन CSMT – कुडाळ – सावंतवाडी यातून केवळ 3 प्रवाशी रत्नागिरी स्टेशनवर उतरले. पहिल्या ट्रेन्सला प्रतिसाद कमी मिळत असला तरी यापुढील ट्रेनला किती प्रतिसाद मिळतो हे पुढील काळातच स्पष्ट होईल. पण, चाकरमान्यांना परतीच्या प्रवाशाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे.