सप्टेंबरपासून आयडिया-व्होडाफोन, एअरटेलचे रिचार्ज महाग होण्याची शक्यता


नवी दिल्ली – रिलायन्स जिओच्या आगमनापूर्व ज्या टेलिकॉम कंपन्या रिचार्जसाठी अधिकचे शुल्क आकारत होते, त्या कंपन्यांची जिओच्या आगमनामुळे त्रेधा उडाली आणि त्यांना नाईलाजस्तव जिओ प्रमाणेच कमी किंमतीचे रिचार्ज स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी लाँच करावे लागले. पण याच कपंन्यांनी डिसेंबर 2019 मध्ये परवडत नसल्याचे सांगत रिचार्जच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रिचार्जच्या किंमतीत वाढ करण्याची तयारी सुरु केली आहे.

कोरोनाच्या ओढावलेल्या संकटामुळे देशात लॉकडाऊन लागू असून सध्या बहुतांश नागरिक वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य देत असल्यामुळे मोबाईल व हॉटस्पॉट इंटरनेटचा, कॉलिंगचा वापर कमालीचा वाढला आहे. देशभरातील अनेक व्यवसायांवर लॉकडाऊनमुळे मोठा परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून अनेकांना कमी पगारात काम करावे लागत आहे. याचा फटका एअरटेल, व्होडाफेन, आयडिया या टेलिकॉम कंपन्यांनादेखील बसला आहे. नुकसान भरून काढण्यासाठी या कंपन्या पुन्हा एकदा त्यांचे प्लॅन महाग करण्याची शक्यता आहे.

स्वस्तातील प्लॅन गेल्या वर्षी 10 ते 40 टक्के महाग करण्यात आले होते. आता पुन्हा एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया प्लॅन महाग करण्याची तयारी करत आहेत. सीएनबीसीच्या एका वृत्तामध्ये हा दावा करण्यात आला आहे. यानुसार एअरटेल आणि व्होडाफोनचे प्लॅन सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये 2 ते 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तर प्रत्येक सहा महिन्यांसाठीच्या प्लॅनमध्ये 10 टक्क्यांची वाढ होऊ शकते. अद्याप यावर टेलिकॉम कंपन्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दुसरीकडे एसबीआय कॅप्सचे विश्लेषक राजीव शर्मा य़ांनी आपल्य़ा अहवालात आणखी एकदा टॅरिफ महाग होण्याची शक्यता आहे. ही वाढ पुढील काही तिमाहींमध्ये होणार आहे. जुलैमध्ये मीडिया अँड एंटरटेनमेंट अँड टेलिकम्युनिकेशंसचे पदाधिकारी प्रशांत सिंघल यांनी सांगितले की सध्याची परिस्थिती पाहता असे वाटत आहे की, कंपन्या पुढील सहा महिन्यांत त्यांचे प्लॅनची रक्कम वाढवू शकतात.