टी-२० विश्वचषकाचे आयोजन पुढे ढकलल्यामुळे धोनीने घेतला निवृत्तीचा निर्णय


नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी इन्स्टाग्राम अकाऊंटवर धोनीने एक छोटोसा व्हिडीओ पोस्ट करत आज संध्याकाळी सात वाजून २९ मिनिटांनी मी निवृत्त झालो असे समजावे…असे म्हणत आपली निवृत्ती जाहीर केली आणि कोट्यावधी भारतीय क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. निवृत्तीसाठी साधलेली धोनीने वेळ आणि दिवस यावरुन अद्याप अनेक चर्चा सुरु आहेत. क्रिकेटमधून धोनीने अचानक घेतलेली निवृत्ती हा सर्व चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का असला तरीही त्याच्या या निर्णयाची त्याच्या जवळच्या व्यक्ती आणि खेळाडूंना आधीपासूनच माहिती होती. धोनीचे शरीर त्याला पूर्वीप्रमाणे आता साथ देत नसले, तरीही त्याची टी-२० विश्वचषकामध्ये खेळण्याची इच्छा प्रबळ होती. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषत स्पर्धेत धोनीला खेळायचे होते. पण कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा आयसीसीने पुढे ढकलली आहे.

न्यूझीलंडकडून २०१९ विश्वचषक स्पर्धेत झालेला पराभव हा धोनीच्या जिव्हारी लागला होता. धोनीच्या घरी काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या एका पार्टीमध्ये त्याच्या जवळच्या मित्राने तो टी-२० विश्वचषकानंतर खेळणार नसल्याचे सांगितले होते. पण तो आयपीएलमध्ये खेळत राहिल. परंतू जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपला अखेरचा सामना खेळण्याचे धोनीचे स्वप्न अखेरीस स्वप्नच राहिले. आता त्याचे शरीर थकले असून ते आता त्याला पहिल्यासारखे साथ देत नाही याची कल्पना धोनीलाही आहे. पण तो टी-२० विश्वचषक खेळून अधिकृतरित्या निवृत्त होणार होता. यंदाच्या वर्षात टी-२० विश्वचषक होत नसल्यामुळे निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे धोनीला पटले होते. ही माहिती धोनीच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या खेळाडूने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

भारतीय संघाचे २०१९ विश्वचषकातील आव्हान संपूष्टात आल्यानंतर भारतीय संघाबाहेर धोनी होता. धोनीला आता संघात स्थान मिळणार नाही हे तत्कालीन निवड समितीने जाहीर केले होते. धोनीने सीएसकेचे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनीवासन यांच्याशी निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी चर्चा केल्याचे वृत्त आहे. आयपीएलचे पुढचे काही हंगाम चेन्नईकडून खेळत राहणार असल्याचे धोनीने सांगितले असून संघाच्या निर्णय प्रक्रियेत भविष्यातही सहभागी व्हायला धोनीला आवडणार आहे. गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात निवृत्तीबद्दल विचारलेल्या प्रश्नालाही धोनीने, जानेवारीपर्यंत विचारु नका, असे उत्तर दिले होते.

Loading RSS Feed