आदित्य यांचा सुशांत प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, मग राऊत का प्रतिक्रिया देतात?


मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा संबंध नाही तर मग शिवसेना नेते संजय राऊत या प्रकरणावर वारंवार का प्रतिक्रिया देत आहेत?, असा सवाल प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

मी आतापर्यंत कधीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात घेतले नाही. त्यांचे नाव मीडियानेच घेतले आहे. सुशांतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यावर न्यायालयाने निर्णय घ्यावा. शिवसेना नेते संजय राऊत वारंवार सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचे सांगत आहेत. मग राऊत का बोलत आहेत?, असा सवाल करतानाच वारंवार राऊतच बोलत असल्यामुळे या प्रकरणात संशय अधिक वाढला असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली.

आदित्य ठाकरे यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाठराखण केली होती. सुशांत प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नाही. त्यांचे नाव याप्रकरणात कुणीही कधीही घेतलेले नाही. या प्रकरणात तुम्ही मीडियाच आदित्य यांचे नाव घेत आहात. सध्याची पत्रकारिता कशी आणि कोणत्या पद्धतीने सुरू आहे हे सर्वजण पाहात असल्याची टीका राऊत यांनी केली होती.

कुणीही सर्वोच्च न्यायालयात कुणाचे नाव घेऊ शकतो. कोणत्याही प्रकरणाला बड्या लोकांची नावे घेतल्याशिवाय सनसनाटी मिळत नाही. त्याला प्रसिद्धी मिळत नसल्यामुळेच अशी नावे मीडियाकडून घेतली जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. सुशांतला खरोखरच न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्याच्या कुटुंबीयांसहीत सर्वांनी शातं राहावे. पोलिसांना त्यांचा तपास करू द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला होता.

सीबीआयकडे सुशांतसिंह प्रकरण सोपवण्यास आमचा कधीच विरोध नव्हता. नाही. पण मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास असल्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी करावा आणि नंतर काही दुवा सुटला असेल तर सीबीआयने त्याचा जरूर तपास करावा. सीबीआयच काय जगातील कोणत्याही संस्थेने हा तपास करावा, पण आधी पोलिसांना तर तपास करू द्या, असे सांगतानाच मुंबई पोलिसांच्या तपासा पलिकडे सीबीआय या प्रकरणात वेगळे काही करेल, असे वाटत नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.