केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल कोरोना पॉझिटिव्ह

कोव्हिड-19 महामारीवर दररोज सरकारतर्फे माध्यमांना माहिती देणारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आंध्र प्रदेश कॅडरचे 1996 बॅचचे 48 वर्षीय आयएएस अधिकारी अग्रवाल यांना एप्रिल-मे महिन्यात कोव्हिड-19 बाबत माध्यमांना सूचना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रवक्ता म्हणून नेमले होते.

अग्रवाल यांनी ट्विट करत माहिती दिली की, मला कोरोना व्हायरसची लागण झाली असून, दिशानिर्देशांनुसार काही दिवस आयसोलेशनमध्ये राहील. सर्व मित्र, सहकर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. आरोग्य विभागाची टीम संपर्कात आलेल्यांचा शोध घेईल. आशा करतो की लवकरच भेट होईल.

मागील काही महिन्यांपासून देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्यापासूनच आरोग्य मंत्रालयाकडून लव अग्रवाल हे माध्यमांना व्हायरसबाबतची, आकड्यांबाबतची सर्व माहिती देत असे.

दरम्यान, देशात दररोज 60 हजार नवे कोरोना रुग्ण आढळत असून, कोरोनाग्रस्तांची संख्या 25 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात महाराष्ट्र हे कोरोनामुळे सर्वात प्रभावित झालेले राज्य आहे.