काँग्रेसने लाँच केली ‘धरोहर’ व्हिडीओ सीरिज , पक्षाचा 135 वर्षांचा इतिहास दाखवणार

देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील संघर्ष, आपले योगदान, इतिसाह, राष्ट्राच्या निर्मितीमधील योगदान दर्शवणारी व्हिडीओ सीरिजची सुरुवात केली असून, काँग्रेस या सीरिजला ‘धरोहर’ असे नाव दिले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटर करत या सीरिजचा प्रोमो शेअर केला. त्यांनी लिहिले की, काँग्रेसचा वारसा, देशाचा वारसा. काँग्रेस पक्षाचे सोशल मीडियाप्रमुख रोहन गुप्ता यांनी सांगितले की, स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष, इतिहास आणि स्वातंत्र्याच्या 70 वर्षात भारताला मोठी शक्ती बनण्यासाठी योगदानाबाबत काँग्रेसकडून या व्हिडीओ सीरिजची सुरुवात करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या सीरिजच्या प्रोमोमध्ये पक्षाच्या 1885 च्या स्थापनेपासून ते काँग्रेसचे पंतप्रधान असलेला कार्यकाळ यात दाखवण्यात आलेला आहे. सोबत या काळात घडलेल्या विशेष घटनांचा, देशातील बदलांचा उल्लेख यात आहे.

या सीरिजचा पहिला एपिसोड देखील शेअर करण्यात आलेला आहे. या एपिसोडमध्ये 1885 मध्ये भारताला संघटित करण्यासाठी कशाप्रकारे काँग्रेसची स्थापना झाली व कोणाकोणाचा यात सहभाग होता याची माहिती देण्यात आलेली आहे.