या अमेरिकन गायिकेने राष्ट्रगीत सादर करत भारताला दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

भारताच्या 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अफ्रिकन-अमेरिकन हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका मॅरी मिलबनने भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच आपल्या मधूर आवाजात व्हर्च्युअल ग्लोबल सेलेब्रेशनमध्ये भारताचे राष्ट्रगीत देखील सादर केले.

मॅरी मिलबन स्वातंत्र्य दिनाच्या भारताला शुभेच्छा देत म्हणाली की, आजचा दिवस हा भारतासाठी, भारतीय-अमेरिकन आणि जगभरात राहणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे. 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सावाच्या मी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजदूत तरंजीत सिंह संधू आणि संपुर्ण भारताला शुभेच्छा देते.

38 वर्षीय मिलबनने 2020 नड्ज फोरममध्ये भारताचे राष्ट्रगीत सादर केले. या फोरममध्ये सलग 24 तास भारताच्या विकासासाठी आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जागतिक नेते आणि अनेक मान्यवरांनी भाग घेतला होता. मिलबन मागील अनेक महिन्यांपासून हिंदी शिकत होती व भारतीय शिक्षकाकडून राष्ट्रगीताची देखील तयारी करून घेत होती.

मिलबन म्हणाली की, हिंदी शिकत असताना मला भारताबाबत मनापासून प्रेम निर्माण झाले. आपण आज एकत्र येण्यास सक्षम नसलो, तरीही स्वातंत्र्याच्या भावनेने आपण व्हर्च्युलरित्या एकत्र आहोत.