मुलींच्या लग्नाचे किमान वय बदलण्याची शक्यता, मोदींचे संकेत

74व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी आज लाल किल्ल्यावरून आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला. याशिवाय मोदींनी यावेळी अनेक घोषणा देखील केल्या. मोदींनी मुलींच्या लग्नाचे वय बदलण्याचे संकेत देखील यावेळी आपल्या भाषणात दिले.

मोदी देशाच्या मुलींना सलाम करत म्हणाले की, भारतातील मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत समीक्षा केली जात आहे. लग्नाचे योग्य वय काय असावे, यासाठी कमेटी बनविण्यात आली आहे. याबाबतचा रिपोर्ट येताच मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.

मोदी म्हणाले, आज भारतातील महिला अंडरग्राउंड कोळसा खाणीत काम करत आहेत, तर लढाऊ विमानांद्वारे आकाशाला गवसणी घालत आहेत. देशातील जे 40 कोटी जनधन खाते उघडले आहेत, त्यातील जवळपास 22 कोटी खाती महिलांची आहेत. कोरोनाच्या काळात एप्रिल-मे-जून या तीन महिन्यात महिलांच्या खात्यात जवळपास 30 हजार कोटी थेट ट्रांसफर करण्यात आले.