आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कॅप्टन कुलचा रामराम,सुरेश रैनाची देखील निवृत्ती

नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ज्याची कॅप्टन कुल अशी ओळख होती अशा महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर करत स्वातंत्र्य दिनी सर्वच क्रिकेट रसिकांना धक्का दिला आहे.आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत.


त्याने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये मात्र दिसणार आहे. ३९ वर्षीय धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. महेंद्रसिंह धोनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ पासून मला निवृत्त समजले जावे, असे त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्या पोस्टसोबतच धोनीनं एक व्हिडीओही शेअर केला आहे.

सुरेश रैनाची देखील निवृत्ती

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याने देखील धोनीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच आपली निवृत्ती सुरेश रैनाने जाहीर केली आहे. रैना २०१८ मध्ये आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर २०१५ मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला. रैनाच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेच्या काही वेळातच रैनानेही आपल्या निवृत्तीची घोषणा केली.