स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला केले संबोधित

74व्या स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केले. त्यांनी सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यंदा कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. देशाला संबोधित करताना यावेळी रामनाथ कोविंद म्हणाले की, या वर्षी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव नेहमीप्रमाणेच उत्साहात साजरा होणार नाही. याचे कारण स्पष्ट असून, जगभरात व्हायरसमुळे जन-जीवनाला मोठे नुकसान झाले आहे. यावेळी त्यांनी अशांती निर्माण करणाऱ्या, ठोस उत्तर दिले जाईल, असे म्हणत चीनला देखील इशारा दिला.

आपल्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वेळीच पावले उचलली. या असाधारण प्रयत्नांमुळे मोठी लोकसंख्या आणि विविध परिस्थिती असणाऱ्या आपल्या विशाल देशात या आव्हानाचा सामना केला जात आहे. राज्य सरकारने स्थानिक परिस्थितीनुसार कारवाई केली व जनतेने देखील सहकार्य केले. या प्रयत्नांमुळे लोकांचे रक्षण करण्यास यश मिळाले. या लढाईत पुढे असलेल्या सर्व डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे ऋणी आहोत.

रामनाथ कोविद म्हणाले की, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये आलेल्या अम्फान चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले, ज्यामुळे आव्हान अधिक वाढले. या महामारीचा सर्वात मोठा प्रहार गरीब व रोंजदारीवर काम करणाऱ्यांवर झाला. त्यांच्या मदतीसाठी, व्हायरसला रोखण्यासोबतच जन कल्याणकारी पावले उचलण्यात आली. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरुवात करून कोट्यावधी लोकांना उपजिविका दिली. या अभियानांतर्गत 80 कोटी लोकांना अन्नधान्य मिळेल हे सुनिश्चित केले.

राममंदिर आणि चीनसोबतच्या संघर्षावर राष्ट्रपती म्हणाले की, सीमेचे रक्षण करताना आपल्या बहादूर जवानांनी आपले प्राण दिले. संपुर्ण देश बलवान खोऱ्यातील बलिदान देणाऱ्यांना सलाम करतो. राम मंदिराबाबत ते म्हणाले की,  मंदिराच्या उभारणीचा शुभारंभ झाला असून, हा देशवासियांसाठी गौरवाचा क्षण आहे.