सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांची मनसेकडून पाठराखण


मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांतसिंह राजपूत प्रकरणात विरोधकांकडून टीका करण्यात येत असतानाच आदित्य ठाकरे यांची राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजू घेतली आहे. अशी काही गोष्ट ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून झाली असेल, असे मला वाटत नसल्याचे प्रतिक्रिया मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. बेस्ट बील दरवाढी विरोधात शिष्टमंडळासह बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची भेट घेण्यासाठी बाळा नांदगावकर कुलाबा येथील बेस्ट भवन येथे आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

बाळा नांदगावकर आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्यात यावेळी तब्बल 2 तास चर्चा झाली. बाळा नांदगावकर याबाबत बोलताना म्हणाले की नागरिकांना भरमसाठ वीज बिले पाठवून बेस्ट प्रशासनाने जो शॉक दिला आहे. त्याबाबत लवकरात लवकर तोडगा निघाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या अनोख्या पद्दतीने बेस्ट प्रशासनाला शॉक दिल्याशिवाय राहणार नाही आणि बेस्ट प्रशासन याला पूर्णपणे जबाबदार असेल.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाशी आणि शिरूर येथे जी वितरण विभागाच्या कार्यालयांची तोडफोड केली होती. त्या खळखट्याक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुलाबा ऑफीस समोर पोलीस प्रशासनाने मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बेस्ट भवनच्या बाहेर पोलिस प्रशासनकडून दोन पोलीस व्हॅन, जलद कृती दलाची गाडी आणून उभी केली होती. यासोबतच बेस्ट भवनच्या प्रत्येक गेटवर पोलिसांची फौज उभी केली होती. यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी मागील काही दिवसांपासून मुंबईतील बेस्ट प्रशासनाचे 89 पैकी केवळ 11 वीज बील भरणा केंद्र सुरू असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते असल्या बाबतचा प्रश्न बाळा नांदगावकर यांना विचारला असता ते म्हणाले की याबाबत बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच इतर वीज भरणा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन बागडे यांनी दिल्याचे नांदगावकर म्हणाले.

शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, त्यांचा तो कौटुंबिक प्रश्न आहे. त्यांचे ते सोडवतील. यासोबतच आदित्य ठाकरे यांचे सुशांतसिंह राजपूत प्रकरणात वारंवार नाव येत असल्याच्या प्रकरणात बोलताना नांदगावकर म्हणाले की, ठाकरे कुटुंबातील व्यक्ती असे काही करेल, असे वाटत नाही. यासोबतच सीबीआय चौकशी बाबत मागणी होत आहे, त्यानुसार या प्रकरणाची चौकशी व्हावी.