ऑक्टोबर महिन्यात दहावी-बारावीत अनुतीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा


मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कायम असून राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या दहावी-बारावीच्या निकालात अनुत्तीर्ण झालेल्या, तसेच एटीकेटीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा मोठा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर मंडळाकडून या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. यानुसार 6 ऑक्टोबरपासून या पुरवणी परीक्षा सुरू होणार आहेत.

संभाव्य वेळापत्रकानुसार, 6 ते 23 ऑक्टोबरदरम्यान इयत्ता दहावीची परीक्षा, 6 ते 29 ऑक्टोबरदरम्यान बारावीची परीक्षा तर व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 6 ते 24 ऑक्टोबरदरम्यान घेण्यात येणार आहे. याशिवाय, 1 ते 23 ऑक्टोबरदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षा, दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्य शिक्षण विषयाची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 24 ते 31 ऑक्टोबरदरम्यान, तर बारावीची प्रात्याक्षिक, लेखी आणि श्रेणी परीक्षा 1 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होईल.

त्याचबरोबर राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकासंदर्भात काही अभिप्राय, सूचना अथवा दुरुस्ती असेल, तर ते 17 ऑगस्टपर्यंत ई-मेलद्वारे पाठविण्याच्या सूचनाही केल्या आहेत. मंडळाने यासाठी secretary.stateboard@gmail.com हा ई-मेल आयडीदेखील जाहीर केला आहे.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याने मंडळाला निर्णय घेण्यास उशिरा लागत असल्याची माहिती समोर येत होती. पण यासंदर्भात शिक्षक आणि पालक मंडळाने लवकर निर्णय जाहीर करावा, अशी मागणी करत होते. कोरोनाचा संसर्ग पाहता, अद्याप काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच जोवर परिस्थिती कायम राहील तोवर शाळा आणि शैक्षणिक संस्था सुरू होण्याची शक्यताही कमीच आहे. मंडळाने यावर्षी जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकातही या परीक्षांसंदर्भात उल्लेख नव्हता. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शाळादेखील सुरू झाल्या आहेत.