या देशातील नागरिकांना मोफत मिळणार कोरोनाची लस

जगभरातील अनेक देशात सध्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. अमेरिकेत देखील काही लसींचे शेवटच्या टप्प्यातील ट्रायल सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी, जर देशात कोरोनाची लस तयार झाल्यास प्रत्येक अमेरिकन नागरिकाला ही लस मोफत दिली जाईल अशी माहिती दिली आहे. सोबतच लसीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असेही म्हटले आहे.

अमेरिकेतील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी पॉल मँगो म्हणाले की, आम्ही तपासणीच्या नियमांमध्ये मागे हटणार नाही. प्रत्येक चाचणीमध्ये लसीला परखूनच मंजूरी दिली जाईल. त्यांनी माहिती दिली की जानेवारी 2021 पर्यंत लसीचे लाख डोसची डिलिव्हरी करण्याची तयारी आहे.

अमेरिकेत सध्या 6 लसींचे ट्रायल सुरू आहे. यासाटी ट्रम्प सरकारने 10 बिलियन डॉलर्सपेक्षा अधिक निधी दिला आहे. सोबतच अनेक कंपन्यांशी करार देखील केला आहे. लसीच्या डोससाठी सरकार पैसे देईल. लस टोचणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे शुल्क खाजगी आणि सरकारी विमा कंपन्या देतील.

मात्र दुसरीकडे नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांच्या आधी ट्रम्प सरकार घाईघाईमध्ये लसीला मंजूरी देईल, याची भिती विरोधकांना वाटत आहे.