भारतात पोहचणार VVIP ‘एअर इंडिया वन’, डिलिव्हरी घेण्यासाठी अधिकारी अमेरिकेला रवाना

एअरफोर्स वनच्या धर्तीवर निर्मित ‘एअर इंडिया वन’ हे व्हीव्हीआयपी विमान लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. एअर इंडिया, इंडियन एअरफोर्स आणि सरकारचे काही अधिकारी सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक टीम व्हीव्हीआयपी एअरक्राफ्ट एअर इंडिया वनला भारतात आणण्यासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, व्हीव्हीआयपी सुरक्षा कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक संयुक्त टीम व्हीव्हीआयपी नेत्यांच्या उड्डाणासाठी वापरण्यात येणाऱ्या एअर इंडिया वनची डिलिव्हरी स्विकारण्यासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे.

दोन बोईंग-777ईआर विमानांपैकी एक ऑगस्टमध्ये भारतात डिलिव्हरीसाठी तयार आहे. हे विमान खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वैकंया नायडू यांच्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक परीक्षण करण्यात आलेले आहे आणि एअर इंडिया वन (बी-777) एअरक्राफ्टचे इंटेरिअर देखील पुर्ण करण्यात आलेले आहे.

बोईंग-77 विमानाच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर या विमानावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा काहीही परिणाम होत नाही. हे विमान एवढे सक्षम आहे की भारत ते अमेरिका हे अंतर एका उड्डाणामध्ये पुर्ण करेल. विमानात हवेतच इंधन भरता येईल. हे विमान एकप्रकारे अभेद्य आहे. विमानाच्या आतच ऑफिस आणि एक मिटिंग रुम तयार करण्यात आली आहे.