ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबत एस्ट्राजेनेकाचा सकारात्मक दावा


मुंबई: सध्या जगभरात रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीची जोरदार चर्चा सुरू आहे. ११ ऑगस्टला खुद्द रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस बनवल्याची घोषणा केली होती. या लसीचे नाव स्पुटनिक- व्ही ठेवण्यात आले आहे. पण या लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेसहित अनेक देशांनी शंका व्यक्त केली आहे.

कोरोनावर ही लस कितपत प्रभावी ठरेल याबाबतही अद्यापही अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. कारण या लसीबाबत कोणताच डेटा रशियाने शेअर केलेला नाही. याच दरम्यान, ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबत एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. या लसीची सध्या मानवी चाचणी सुरू झाली असून या लसीवर काम करणाऱ्या एस्ट्राजेनेका कंपनीचे असे म्हणणे आहे की या लसीची मानवी चाचणी सुरू झाली असून या वर्षी नोव्हेंबरपर्यंत ती पूर्ण होईल. त्यानंतर या लसीचे उत्पादन पुढच्या वर्षी २०२१च्या सुरूवातीला सुरू होऊ शकते.

त्याचबरोबर कंपनीचे असे देखील म्हणणे आहे की लॅटिन अमेरिका देशांसाठी पुढील वर्षी लसीच्या ४० कोटी डोस निर्माण केले जातील. आतापर्यंत पाच कंपन्यांशी अमेरिकाने लसीसाठी करार केला आहे. यात अॅस्ट्राजेनेका आणि मॉडर्ना या कंपन्यांचाही समावेश आहे. त्यानुसार अमेरिकेसाठी अॅस्ट्राजेनेका लसीचे ३० कोटी डोस तयार करेल. तर इतर कंपन्यांसोबत १०-१० कोटींसाठी करार करण्यात आला आहे.

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीसाठी अॅस्ट्राजेनेका कंपनीसोबत भारतातही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने करार केला आहे. कोविशिल्ड हे नाव या लसीला देण्यात आले आहे. देशात याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी नुकतेच म्हटले होते की प्रती मिनिट ५०० डोस त्यांची कंपनी या लसीचे तयार करेल. त्यांचे म्हणणे होती की सुरूवातीला दर महिन्याला ४० ते ५० लाख लस बनवण्यावर लक्ष दिले जाईल. हे हळू हळू वाढवले जाईल. कंपनीचे वर्षाला ३५ ते ४० कोटी लस बनवण्याचा मानस आहे.

त्याचबरोबर अदार पूनावाला यांनी म्हटले होते की ऑक्सफर्डच्या या लसीची भारतात किंमत खूप कमी असेल. त्यांनी खूप आधी म्हटले होते की भारत आणि बाकी दुनिया यांच्यात ५०-५० टक्क्यांची विभागणी होऊ शकते. सध्या भारतात या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे.