देशात काल दिवसभरात १००७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर ६४,५५३ नव्या रुग्णांची नोंद


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर दररोज ६० हजारांच्यापुढे नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यातच काल दिवसभरात देशात ६४ हजार ५५३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर १००७ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २४ लाख ६१ हजार १९१ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर देशात आतापर्यंत ४८ हजार ४० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मागील २४ चोवीस तासांत एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

त्याचबरोबर दैनंदिन कोरोनामुक्त रुग्णांचीही विक्रमी नोंद झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये ५६,३८३ रुग्ण बरे झाले असून ७०.७६ टक्क्यांवर हे प्रमाण पोहोचले आहे. तर १७ लाखांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ६,६१,५९५ रुग्ण उपचाराधीन आहेत. मृत्यू दर दोन टक्क्यांपेक्षाही कमी १.९६ टक्क्यांवर आला आहे.

सर्वाधिक चाचण्या मागील चोवीस तासांमध्ये करण्यात आल्या. गुरुवारी दिवसभरात ८ लाख ४८ हजार ७२८ जणांच्या चाचण्या केल्या गेल्या. एकूण २.७६ कोटी चाचण्या झाल्या असून १० लाख लोकसंख्येमागे १९ हजार ४५३ चाचण्या केल्या जात आहेत. या आठवडय़ात प्रतिदिन ६ लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या गेल्या आहेत.