पाक सेनेच्या प्रवक्त्याचा पोकळ दावा; भारताकडे राफेल असो किंवा अन्य काही आम्ही घाबरत नाही


राफेल विमानांच्या खरेदीवरुन झालेल्या अनेक चर्चेअंती अखरे देशात मागच्या महिन्यात या विमानांची पहिली खेप भारतात दाखल झाली. त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतात राफेल आल्याची चिंता त्या देशांना पडली असेल, जे भारताच्या अखंडतेला वारंवार आव्हान देण्याचे काम करत असतात, असे ट्विटच्या माध्यमातून म्हटले होते. त्यावर पाकिस्तानी सेनेच्या प्रवक्त्यांनी भारताने ५ राफेल आणू द्या अथवा ५०० आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही कोणत्याही परिस्थिती त्यांच्याशी दोन हात करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

भारतात दाखल झालेल्या राफेलवर बोलताना पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी सांगितले की, भारताकडे राफेल असो वा एस ४००.. पाकिस्तानी सैन्य कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयारीत आहे. इफ्तिखार पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांना यात राफेल, भारताचे वाढते सुरक्षा बजेट, काश्मीर, सीमोल्लंघन आणि पाक-सौदी अरबच्या संबधांवर पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. मेजर जनरल इफ्तिखार त्यावर म्हणाले, भारताचा वाढता लष्करी खर्च आणि संरक्षण बजेटबद्दल पाकिस्तान चिंताग्रस्त आहे, पण कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तत्पर आहोत.

मेजर जनरल इफ्तिखार राफेलमुळे पाकिस्तानला निर्माण झालेल्या धोक्याशी संबंधित प्रश्नावर म्हणाले, भारत जगात सैन्यावर सर्वाधिक खर्च करीत आहे. शस्त्रांच्या शर्यतीतही तो सहभाही आहे. पण फ्रान्स ते भारत यामध्ये पाच मार्गांचा प्रवास ज्या प्रकारे झाला होता, त्यावरून त्यांची असुरक्षितता दिसून येते. पाच राफेल त्यांनी खरेदी केले किंवा ५०० याची पर्वा आम्ही करत नाही, आम्ही त्यांचा मुकाबला करण्यासाठी सदैव तयार आहोत आणि आम्हाला आमच्या क्षमतेविषयी तसुभर शंका नाही. राफेलच्या येण्याने आम्हाला काडीमात्र काही फरक पडणार नसल्याचे पोकळ वक्तव्य त्यांनी केले. त्याचबरोबर मेजर जनरल इफ्तिखार यांनीही पाकिस्तानच्या ढासळत्या आणि भारताच्या वाढत्या संरक्षण अर्थसंकल्पाबद्दल चिंता व्यक्त केली.

भारताचा संरक्षण खर्च आणि अर्थसंकल्प हा आमच्या तुलनेत पारंपारिक समतोलच्या विरुद्ध आहे. याकडे आंतरराष्ट्रीय समुदायानेही लक्ष दिले पाहिजे. पाकिस्तानमधील बरेच लोक म्हणतात की, पाकिस्तानचे संरक्षण बजेट खूप जास्त आहे. आम्ही बजेटचा १७ टक्के हिस्सा यावेळी सैन्य, नौदल आणि हवाई दलावर खर्च करीत आहोत आणि गेल्या १० वर्षांत पाकिस्तानचा संरक्षण खर्च सातत्याने कमी होत आहे. असे असूनही आमच्या क्षमता कमी झाल्या नसल्यामुळे राफेल आणू द्या किंवा एस -४०० आमची तयारी पूर्ण असल्याचे मेजर जनरल इफ्तिखार यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला मेजर जनरल इफ्तिखार यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना काश्मीरवरुन भारताला लक्ष्य केले. या प्रदेशातील लोकसंख्या भारत नियोजित पद्धतीने बदलून तेथील स्थानिक मुस्लिमांना हटवायचे आहे. काश्मिरींनी असा कोणताही छळ अनुभवलेले नाही. तेथील तरुण शहीद होत आहेत आणि दहशतवादाच्या नावाखाली त्यांना पुरण्यात आले आहे. कश्मीरींना भारतीय सैन्याने पेलेट गनने लक्ष्य केले आहे. यावेळी स्थानिक नेतृत्वाला एका वर्षासाठी कोठडीत ठेवण्यात आले आहे. संपूर्ण जगासमोर काश्मिरींचा प्रश्न ठेवण्यात पाकिस्तानने कसलीही कसर सोडली नसल्याचे इफ्तिखार यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसांचे कोरोना महामारीदरम्यान आवाहन असूनही पारंपारिक भ्याड कृत्ये भारताने सुरूच ठेवत निरपराध लोकांना लक्ष्य केले. जड शस्त्रे देखील वापरली जातात. सीमा उल्लंघनाला पाकिस्तानी सैन्य देखील प्रभावीपणे उत्तर देत आहे. भारतावर त्यांनी वंशवाद आणि जातीयवाद पसरवल्याचा आरोपही केला. त्याचबरोबर जातीय द्वेषाची आग पेटवण्यास भारताने सुरुवात केली आणि ती देशभर पसरल्याचे त्यांनी म्हटले आहे.