मुंबईत पालिकेच्या संमतीने या परिसरात विसर्जनासाठी असणार कृत्रिम तलाव


मुंबई : राज्यावर ओढावलेल्या कोरोना परिस्थितीमुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई महानगरपालिकेकडे दादर- माहीम परिसरात कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी अशी मागणी करण्यात आली होती. आता त्या मागणीला महानगरपालिकेने संमती दर्शविली आहे.

गणेशोत्सव काळात कृत्रिम तलावात घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. पण प्रत्यक्षात कृत्रिम तलावांची संख्या कमी असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यासाठी मनसेचे उपाध्यक्ष व दादर-माहीम विधानसभा विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आज परिमंडळ 2 चे पालिकेचे सहआयुक्त नरेंद्र बर्डे आणि जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची भेट घेत त्याना निवेदन सादर केले.

मनसेने दादर-माहीम परिसरात गणेश विसर्जनांसाठी कृत्रिम तलावांसाठी जागा सुचविल्या होत्या, त्यानुसार पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या वतीने दादर-माहीम परिसरात 7 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले. त्यानुसार आता शिवाजीपार्क येथील महानगर पालिका क्रीडा भवन, मृदुंगाचार्य मैदान, रमा गावंडे मैदान, जाखादेवी मंदिर भूखंड-दादर, अॅन्टोनिया शाळेचे पटांगण, एस. के. बोले रोड येथील चौधरी वाडी मैदान, प्रभादेवी येथील चवन्नी गल्ली मैदान व धारवीत तीन याठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे.