‘सडक 2’च्या ट्रेलरला लाखोंच्या संख्येत मिळाले डिसलाईक


कालच म्हणजे 12 ऑगस्ट रोजी संजय दत्त, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर यांच्या बहुप्रतिक्षित ‘सडक 2’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता, त्याचबरोबर तो यू ट्यूबवर ट्रेण्डही होत आहे. या ट्रेलरला 24 तासांच्या आत एक कोटी 14 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव्ज मिळाले असले तरी त्याचवेळी दूसरीकडे या ट्रेलरला 43 लाखांपेक्षा जास्त डिसलाईक मिळाले आहे, जो एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. तर केवळ अडीच लाखांच्या जवळपास हा ट्रेलर लाईक करणाऱ्यांची संख्या आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरच्या लाईक आणि डिसलाईकमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. यू ट्यूबवर अपलोड केल्याच्या 12 तासातच हा ट्रेलर 36 लाखांपेक्षा जास्त वेळा डिसलाईक करण्यात आला. तर 20 लाख डिसलाईक 8 तासांच्या आत झाले. त्यामुळे हा ट्रेलर सर्वाधिक नापसंत केलेला व्हिडीओ म्हणून समोर आला आहे. विशेष म्हणजे जगभरात सर्वाधिक नापसंत केलेल्या टॉप 50 व्हिडीओंमध्ये ‘सडक 2’ चा ट्रेलर अकराव्या स्थानावर पोहोचला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की लोक मोठ्या संख्यने ‘सडक 2’चा ट्रेलर नक्कीच पाहत आहेत, परंतु बॉलिवूडमध्ये नेपोटिझम आणि नेपोटिझमच्या केंद्रस्थानी असलेल्या कलाकारांना घेऊन बनवलेल्या या चित्रपटाबाबत आपला संताप व्यक्त करताना थेट डिसलाईकचे बटण क्लिक करत आहेत. प्रेक्षक थेट ‘सडक 2’ च्या ट्रेलरवर निशाणा साधत आहेत.

प्रेक्षक ट्रेलर डिसलाईक करुन नेपोटिझमने भरलेला हा चित्रपट न पाहण्याचे संकेत देत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरवर सोशल मीडियावर कठोर शब्दात कमेंट आणि टिप्पणी केली जात आहे. यावरुनच त्यांची नाराजी स्पष्ट होत आहे. नेपोटिझमुळे ‘सडक 2’ न पाहण्याचे आणि ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे ते म्हणजेच डिस्ने हॉटस्टार अॅप अनइन्स्टॉल करण्याची विनंती काही जण करत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री आलिया भट्टने देखील हा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला, पण तिने आपला कमेंट बॉक्स बंद केला, जेणेकरुन नेटिझन्स तिच्यावर किंवा चित्रपटावर काही वाईटसाईट कमेंट्स करु नयेत.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडला जोरदार झटका बसला. लोक सातत्याने सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत. तर नेपोटिझमवरुन बॉलिवूडच्या स्टारकिड्स विरोधात संतापही व्यक्त करत आहेत. परंतु त्याचा फटका सध्या ‘सडक 2’च्या ट्रेलरला बसत आहे.