सुशांत प्रकरण : करणी सेनेने संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केली तक्रार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबईपासून ते बिहारपर्यंत राजकारण तापले आहे. आता या प्रकरणात करणी सेनेने बिहारच्या सीतामढी येथे शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुंबईच्या पोलीस कमिश्नरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत आज तकने वृत्त दिले आहे.

करणी सेना सुशांत प्रकरणात वारंवार आपली प्रतिक्रिया देत आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीपासून ते मुंबई पोलिसांवर वारंवार निशाणा साधत आहे. आता सीतामढीचे करणी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बिहारी सिंह यांनी मुंबई पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी हत्येचे साक्षीदार असणाऱ्यांना लपवले आहे. एवढेच नाहीतर या तक्रारीमध्ये संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे त्यांचे संबंध चांगले नव्हते, असा दावा केला होता. अशात आता करणी सेनेने संजय राऊत यांचे हे विधान बिहारच्या अस्मितेशी जोडले आहे. त्यांना हा बिहारचा अपमान असल्याचे म्हटले आहे. सोबत मुंबईत बिहार पोलिसांना योग्य वागणूक मिळाली नसल्याचे देखील म्हटले आहे.