या देशात होणार रशियाच्या कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर लस तयार केल्याचा दावा रशियाने केला आहे. या लसी स्पुटनिक व्ही असे नाव देण्यात आले आहे. मात्र या लसीवर अनेक देशांनी शंका उपस्थित केली आहे. जवळपास 20 देशांनी या लसीची ऑर्डर देखील दिली आहे. असे असले तरी लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अजून बाकी असून, ऑक्टोंबर महिन्यापासून हे ट्रायल सुरू होणार आहे. विशेष म्हणजे रशियाच्या या लसीचे ट्रायल फिलिपाईन्समध्ये होणार आहे.

फिलिपाईन्स ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये स्पुटनिक-व्ही लसीचे ट्रायल करेल. फिलिपाईन्सचे राष्ट्रीय प्रवक्ते हॅरी रोके यांनी माहिती दिली की, रशियाच्या कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल ऑक्टोबर ते मार्च दरम्यान होईल.

हॅरी यांनी माहिती दिली की, लसीच्या ट्रायलसाठी निधी देखील रशियाचे सरकारच देणार आहे. लसीचा प्रभाव, याचे परिणाम जाणून घेण्यासाठी फिलिपाईन्सच्या हजारो रुग्णांना लस टोचली जाईल. फिलिपाईन्सचे खाद्य आणि औषध प्रशासन (एफडीए) एप्रिल 2021 मध्ये या लसीला मंजूरी देईल अशी आशा आहे. फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी या लसीचे परिक्षण स्वतःवर करण्याची देखील इच्छा व्यक्त केली होती.