रावसाहेब दानवेंच्या जावयाचा घटस्फोटासाठी अर्ज


औरंगाबाद : कौटुंबिक त्रासाला कंटाळून केंद्रीय मंत्री रावसाहेब दावने यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती स्वतः हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे.

त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव यांनी मला कोणीही भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून संबोधू नये, अशी विनंतीही केली. तसेच पत्नी संजना जाधव यांच्याशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली असल्याचेही जाधवांनी सांगितले. आपण कौटुंबिक त्रासाला आणि रावसाहेब दानवे यांच्यामुळेही त्रस्त झाल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली. त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा पुनरुल्लेख केला. हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत.