कमाईपेक्षा अधिक द्यावा लागला रिफंड, रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असे

रेल्वेला तिकिट बुकिंगमधून झालेल्या कमाईपेक्षा अधिक रक्कम रिफंड म्हणून प्रवाशांना परत करावी लागली आहे. भारतीय रेल्वेच्या 167 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले असावे. कोरोना व्हायरस महामारीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रेल्वेच्या पेसेंजर ट्रेनच्या उत्पन्नात 1066 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती आरटीआयमध्ये समोर आली आहे.

आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या कालावधीमध्ये रेल्वेला पॅसेंजर ट्रेनमधून नुकसान झाले आहे. तर मालभाड्यातून होणारे उत्पन्ना समान होते. कोरोना व्हायरसमुळे आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत पॅसेंजर ट्रेन बंद होत्या. या काळात प्रवाशांना तिकिटाचे भाडे परत करावे लागल्याने एप्रिलमध्ये 531.12 कोटी रुपये, मे महिन्यात 145.24 कोटी रुपये आणि जून महिन्यात 390.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

रेल्वेचे प्रवक्ते डी. जे. नारायण यांनी सांगितले की, ही रक्कम रेल्वेने आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त लोकांना रिफंड दिल्याचे दर्शवते. मागील वर्षी रेल्वेने एप्रिलमध्ये 4,345 कोटी रुपये, मे महिन्यात 4463 कोटी रुपये आणि जूनमध्ये 4589 कोटी रुपयांची कमाई केली होती. रेल्वेला महामारीमुळे चालू आर्थिक वर्षात जवळपास 40 हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे माल भाड्यातून कमाई करत आहे. रेल्वेने माल भाड्यातून एप्रिल महिन्यात 5,744 कोटी रुपये, मे महिन्यात 7,289 कोटी रुपये आणि जून 8,706 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

लॉकडाऊनमध्ये कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सरकारने स्पेशल रेल्वे चालवल्या. यातून देखील रेल्वे 2000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.