ठाणे महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम; गणपती विसर्जनासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब


ठाणे : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. पण यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे यावेळी साधेपणात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर विसर्जनाच्या दरम्यान गर्दी होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिकेने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वत्तीने करण्यात आले आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन ठाण्यात या वर्षी केले जाईल. महापालिकेच्या डीजीठाणे प्रणालीच्या माध्यमातून यासाठी ऑनलाईन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊ ठेपल्यामुळे राज्य सरकारच्या आवाहनानुसार ठाणे महानगरपालिकेने देखील हा उत्सव सर्वांनी साधेपणे साजरा करावा यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गणपतीची मूर्तीची उंची काही फुटांची असावी येथपासून ते किती जणांनी आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी व्हावे येथपर्यंत नियम आखून दिलेले आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

तसेच विसर्जनावेळी होणारी गर्दी लक्षात घेवून महापालिका क्षेत्रात यावर्षीही 13 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती आणि एकूण 20 ठिकाणी मुर्ती स्विकृती केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहेत. या ठिकाणी कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याला प्राधान्य देऊन आणि भाविकांच्या सोयीसाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आता डिजीठाणे कोव्हिड-19 डॅशबोर्डच्या संकेतस्थळावर विसर्जनाचे टाइमस्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठाणेकरांसाठी ही सुविधा शुक्रवार 14 ऑगस्ट,2020 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी www.covidthane.org या महानगरपालिकेच्या अधिकृत डिजीठाणे डॅशबोर्ड लिंकवर जाऊन Ganesh Visarjan Booking हे पर्याय निवडावे लागेल. नंतर आपल्या प्रभागातील कृत्रिम तलावांची किंवा मुर्ती स्विकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक करून महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. यामुळे एकाच वेळी होणारी मोठी गर्दी टाळण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रसार देखील रोखता येणार आहे.