15 ऑगस्टला लाल किल्यावर खलिस्तानी झेंडा फडकवण्याचा कट, जाहीर केले इनाम

स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्थेने (आयबी) अलर्ट जारी केला आहे. आयबीकडून सांगण्यात आले आहे की, खलिस्तानच्या मागणीसाठी शीख फॉर जस्टिस ही संघटना लाल किल्ल्यावर 14, 15 आणि 16 ऑगस्टला खलिस्तानचा झेंडा फडकवू शकते. हा झेंडा फडकणाऱ्याला ही संघटना सव्वा लाख डॉलर इनाम देखील देणार आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, यासाठी शीख फॉर जस्टिसने एक व्हिडीओ देखील अपलोड केला आहे. व्हिडीओमध्ये खलिस्तानी झेंडा लाल किल्ल्यावर फडकवण्याची घोषणा केली आहे. हा झेंडा फडकवणाऱ्याला सव्वा लाख डॉलर देण्यात येईल, असे व्हिडीओत म्हटले आहे. आयबीकडून या प्रकराचा अलर्ट मिळाल्यानंतर लाल किल्ला आणि आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. भारतीय सैन्य आणि दिल्ली पोलीस लाल किल्याच्या चारही बाजूला तैनात आहे.

शीख फॉर जस्टिसचा प्रमूख गुरुवंतपंत पन्नू आहे. हा तोच व्यक्ती आहे, जो रेफरेंडम 2020 चालवत आहे.  व्हिडीओमध्ये गुरुवंतपंत 15 ऑगस्ट हा दिवस 1947 च्या फाळणी वेळी शीखांना झालेल्या त्रासाची आठवण करून देतो, असे म्हणत आहे.