PUC नसल्यास या राज्यात भरावा लागणार तब्बल 10 हजारांचा दंड


नवी दिल्ली : वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने गेल्या वर्षी वाहतुकीचे नियम अधिक कठोर केले होते. त्यानुसार आधीच्या दंडात 10 पटींनी वाढ करत तुरुंगवासासारख्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली होती. त्यात वाहनाची PUC नसल्यास तब्बल 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याची तरतूद करण्यात आली होती. आता दिल्ली आरटीओने याच नियमाची अंमलबजावणी सुरु केली असून आता देशभरातही हे नियम हळूहळू लागू होण्य़ाची शक्यता आहे.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरूसह अनेक शहरांमध्ये प्रदुषणाची समस्या वाढत असून वाहनांच्या धुराचा या समस्येमध्ये सर्वात मोठा वाटा आहे. राजधानी दिल्लीला याचा मोठा फटका हिवाळ्यात बसतो. यामुळे दिल्ली सरकारने प्रदुषण करणारी वाहने हद्दपार करण्याचे ठरविले आहे. यानुसार दिल्ली सरकारने पीयुसी प्रमाणपत्र नसल्यास वाहन चालकांना तब्बल 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेद्वारे गेल्या काही दिवसांत अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून चलान फाडण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये 40 पथके परिवहन विभागाने तैनात केली असून जी वाहनांचे पीयुसी प्रमाणपत्र तपासणार आहेत. दिल्लीमध्ये 13 मोठ्या प्रमाणावर प्रदुषण करणारे हॉटस्पॉट आहेत. या टीम त्याठिकाणी काम करणार आहेत. ही टीम वाहनांच्या इंधनाचे नमुनेही गोळा करत आहेत. त्यामध्ये कोणत्याप्रकारची भेसळ झाली आहे का, हे देखील तपासले जात आहे.