खरा राजा! पक्ष्याने मर्सिडिजवर घरटे बांधल्याने दुबईच्या राजकुमाराने गाडी वापरणेच केले बंद

दुबईचे क्राउन फ्रिन्स शेख हमदान यांचे सध्या त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी आपल्या मर्सिडिज एमएमजी जी63 एसयूव्हीचा वापर करणे बंद केले आहे. या एसयूव्हीचा वापर करणे बंद करण्यामागे खास कारण आहे व याच कारणामुळे शेख हमदान यांचे कौतुक होत आहे.

पर्यावरणवादी असलेले शेख हमदान यांच्या गाडीवर एक पक्ष्याने आपले घरटे बांधले. हे हमदान यांनी पाहिल्यावर त्यांनी ती गाडीच वापरणे बंद केले. त्यांनी सोशल मीडियावर देखील याचा व्हिडीओ शेअर केला असून, हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गाडीचा वापर होऊ नये म्हणून त्यांनी गाडीच्या बाजूने टेप लावला आहे. सोबतच पक्ष्याला त्रास होऊ नये म्हणून, गाडीच्या जवळ न जाण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. व्हिडीओमध्ये पक्षी एसयूव्हीच्या विंडशिल्डवर बसलेला दिसत आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पक्ष्याचे पिल्लू अंड्याच्या बाहेर येताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, कधीकधी आयुष्यात लहान गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आतापर्यंत 16 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे. युजर्स त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत.