धोनीने केली कोरोना चाचणी, रिपोर्टवर अवलंबून आयपीएल वारी

कोरोना व्हायरस महामारी संकटातच यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएलची सुरुवात होणार आहे. लीगमधील सर्व संघ यूएईला रवाना होण्याची तयारी करत आहे. 20 ऑगस्टनंतर सर्व संघ यूएईला रवाना होतील. कोरोनाच्या संकटामुळे बीसीसीआयने खेळाडू आणि संघांसाठी कठोर नियमावली जारी केलेली आहे. कोरोना चाचणी नेगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडू इतर खेळाडूंना भेटू शकतील. यासाठी सर्व फ्रेंचाईजी आपल्या खेळाडूंच्या चाचण्या करत आहे.

मागील अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून लांब असलेल्या धोनीला आयपीएलमध्ये खेळताना पाहण्याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. अमर उजालाच्या वृत्तानुसार, महेंद्र सिंग धोनी आणि त्याचा सहकारी खेळाडू मोनू सिंहने काल कोरोना चाचणीसाठी आपले नमुने दिले आहेत. रांचीच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांचे नमुने घेण्यात आले. दोन्ही खेळाडूंची रिपोर्ट लवकरच येण्याची शक्यता आहे. खेळाडूंचे रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर सीएसकेचे खेळाडू यूएईला रवाना होतील.

15 ऑगस्टला सीएसके संघाचा कॅम्प देखील चेन्नईमध्ये लागणार आहे. चेन्नईला पोहचल्यानंतर खेळाडूंना पुन्हा चाचणी करावी लागेल. त्यानंतर यूएईला पोहचल्यानंतर खेळाडूंना सहा दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहावे लागेल. धोनीसाठी यावर्षीचे आयपीएल महत्त्वाचे आहे. कारण तब्बल दीड वर्षांनी धोनी मैदानात उतरणार आहे. सोबत पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने देखील ही महत्त्वाची संधी आहे.