ब्राझीलवरुन आलेल्या चिकनमध्ये सापडला कोरोना; चीनचा दावा


बीजिंग – ब्राझीलमधून आलेल्या फ्रोजन चिकनमध्ये कोरोना सापडल्याचा दावा चीनने केला आहे. इक्वाडोरवरुन मागच्या आठवड्यात चीनमध्ये पाठवलेल्या समुद्री झींग्यातही कोरोनाचे संक्रमण असल्याचे म्हटले जात होते. जूनमध्ये ब्राझीलसह इतर काही देशातून येणाऱ्या मांसाच्या आयातीवर चीनने बंदी घातली होती. पण ही बंदी आता उठवण्यात आली आहे.

ब्राझीलवरुन आलेल्या चिकनचे शेंजेनच्या लोकल डिजीज कंट्रोल सेंटरने (सीडीसी) नियमित तपासणीदरम्यान सँपल घेतले होते. त्यांनी केलेल्या परिक्षणानंतर चिकनमध्ये कोरोना व्हायरस आढळला. ब्राझीलवरुन चिकनसोबत आलेल्या दुसऱ्या मीट प्रोडक्टरचे सँपल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान यावर ब्राझीलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दुसऱ्या देशातून आलेले फूड प्रोडक्ट खाताना सावध राहण्याचा इशारा शेंजेन सीडीसीने दिला आहे. चीनची राजधानी बीजिंगच्या शिनफॅडी सीफूड मार्केटमधून संक्रमणाची प्रकरणे जूनमध्ये समोर आली होती. तेव्हापासून विविध फुड प्रोडक्टचे सँपल घेऊन सरकार परीक्षण करत आहे.