रिलायन्स खरेदी करू शकते टीक-टॉक ?


भारताने चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घातली असून या अॅप्समध्ये तरुणाईच्या आवडत्या Tik-Tok चा (टीक-टॉक) देखील समावेश होता. भारतानंतर चीनच्या या लोकप्रिय अॅपवर अमेरिकेनेही बंदी आणली आहे. या दरम्यान टीक-टॉक अमेरिकेची मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार होती. यासंदर्भातील चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. पण यावर बंदीचे आदेश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी करताच आता रिलायन्ससोबत टीक-टॉकने जवळकी वाढवायला सुरुवात केली आहे.

यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स टीक-टॉक खरेदी करू शकते, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. इकॉनॉमिक टाईम्सला याच्याशी संबंधित सहा लोकांनी माहिती दिली आहे. रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना टीक-टॉकचे सीईओ केविन मेयर भेटले आहेत. रिलायन्स भारतातील टीक-टॉकचा व्यवसाय खरेदी करू इच्छित आहे की नाही हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. एका अधिकाऱ्यांने सांगितले की, रिलायन्स आणि टीक-टॉकचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत.

आता टीक-टॉकला रिलायन्स खरेदी करणार असल्याच्या चर्चांनी बाजार गरम असला तरीही ही अफवा असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यावर त्यांनी अन्य कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रिलायन्स प्रवक्त्याने सांगितले की कंपनी नेहमी सेबीच्या नियमांचे पालन करते. स्टॉक एक्स्चेंजच्या करारानुसार आम्ही सूचना देतो. दुसरीकडे यावर अद्याप टीक-टॉकनेही कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्याचबरोबर यावर प्रतिक्रिया देण्यास मायक्रोसॉफ्टनेही नकार दिला आहे. केविन मेयर यांनाच मेल करण्यात आला होता. पण, सुत्रांनुसार टीक-टॉक डीलची चर्चा सुरुवातीच्या टप्प्यात आहे. कदाचित ही डील होणारही नाही, कारण यामध्ये खूप अडचणी आहेत.