उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल – निलेश राणे


मुंबई – सर्वोच्च न्यायालयात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली असून पाटणा पोलिसांकडे या प्रकरणामध्ये सुशांतच्या वडीलांनी दाखल केलेली तक्रार ही ग्राह्य धरून बिहार पोलिसांनी चौकशी न करता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांना करु देण्यात यावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. पण महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख या सुनावणीदम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजप नेते निलेश राणे यांनी केल्यामुळेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागणार असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

ट्विटरवरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचे नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला असल्याचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

या प्रकरणाशी आदित्य यांचा संबंध असल्याचा दावा करणारे अनेक तर्कवितर्क मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे. पण आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी एका वृत्तावाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. या सर्व प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काय संबंध? हिंमत असेल तर भाजपच्या लोकांना जाहीरपणे त्यांचे नाव घ्यावे. ते चांगले काम करत आहेत, मदत करत आहेत. बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हे चांगले राजकारण नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.