ऑक्टोबर महिन्यापासून पुढील एका वर्षासाठी पुणे विमानतळावर येणार वेळेच्या मर्यादा


पुणे : पुणे विमानतळावर येत्या 26 ऑक्टोबरपासून पुढील एक वर्ष सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या वेळेतच विमानांची ये जा होणार आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पुणे विमानतळ पूर्णतः बंद ठेवण्याची वेळही येऊ शकते, असे पुणे विमानतळ कार्यालयाचे निर्देशक कुलदीपसिंग यांनी म्हटले आहे.

भारतीय वायुदलाच्या जागेमध्येच पुणे विमानतळ उभारण्यात आले असून वायूदलाला धावपट्टीच्या दुरुस्तीचे आणि विस्तारीकरणाचे काम सुरु करायचे आहे. त्यासाठी विमानतळ रात्रीच्या वेळेस बंद ठेवावे लागणार आहे. पुणे विमानतळाला स्वतःची जागा नसल्यामुळे भारतीय वायुदलाच्या लोहगाव येथील हवाई तळाच्या जागेमध्येच पुणे विमानतळ उभे आहे. वायुदलाकडून हवाई तळाचा एक भाग वापरला जातो तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे असलेल्या दुसऱ्या भागात प्रवासी विमानांची ये जा होत असते. पण वायूदलाला त्यांच्या ताब्यात असलेल्या भागात धावपट्टीचे विस्तारीकरण आणि दुरुस्ती करायची असल्यामुळे सर्वच विमानांच्या टेक ऑफ आणि लॅंडिगवर मर्यादा येणार आहेत.

पुणे विमानतळ नवीन जागेत सुरु करण्याची चर्चा गेली अनेक वर्ष सुरु आहे. पण त्यासाठी लागणाऱ्या शकडो एकर जमिनीच्या अधिग्रहणात अनेक अडचणी येत असल्यामुळे नवीन विमानतळ उभे राहू शकले नाही. पण आता त्याचा परिणाम विमान प्रवासावर होणार आहे. पुण्याच्या शेजारी विमानतळ उभारण्यासाठी आधी चाकणची निवड करण्यात आली होती. पण तो प्रकल्प बारगळल्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडजवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्याची घोषणा करण्यात आली. परंतु त्याठिकाणी देखील नागरिकांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध केल्यामुळे विमानतळासाठी आवश्यक असलेली जमीन अजूनही अधिग्रहित होऊ शकलेली नाही.

दुसरे महायुद्ध सुरु झाल्यानंतर 1939 साली इंग्रजानी पुण्याजवळील लोहगांव येथे लढाऊ विमानांसाठी धावपट्टी तयार केली होती. शत्रूच्या हल्ल्यापासून मुंबईला वाचवण्यासाठी त्यावेळच्या रॉयल एअरफोर्सकडून लोहगावला धावपट्टी तयार करण्यात आली होती. भारतीय वायुदलाने स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी लढाऊ विमानांसाठी हवाईतळ उभारला. लोहगाव हवाई तळाचा उपयोग मिग, सुखोई यासारख्या विमानाचे प्रशिक्षण देण्यासाठी हवाईदलाकडून केला जातो. या तळावर वायुदलाला अनेक वर्षांपासून दुरुस्ती करायची आहे, पण प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या नागरी विमानाचे काय करायचे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता.

पण आता वायुदलाला हवाईपट्टीच काम करणे गरजेचे बनले असल्यामुळे विमानतळावरून ये जा करणाऱ्या विमानांवर निर्बंध घालण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या निर्बंधांमुळे पुणे विमानतळावर कोणताही परिणाम होणार नाही. विमानांना दिवसाची वेळ टेक ऑफ आणि लॅन्डिंगसाठी उपलब्ध करून दिली जाईल, असा दावा पुणे विमानतळ कार्यालयाचे निर्देशक कुलदीपसिंग यांनी केला आहे. पण विमानांच्या वेळेवर मर्यादा आल्यास साहजिक त्याचा परिणाम प्रवाशांवर होण्याची शक्यता असून पुण्यातील लोकांना विमान प्रवासासाठी मुंबई विमानतळाचा उपयोग करावा लागू शकतो. त्याचबरोबर एप्रिल आणि मे महिन्यात पुणे विमानतळ संपूर्णपणे बंद ठेवावा लागल्यास पुणेकरांना मुंबई विमानतळावर पोहचून विमानप्रवास करावा लागेल.