समोर आले रशियन कोरोना प्रतिबंधक लसीचे धक्कादायक वास्तव


रशियाचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी काल कोरोनावरील लस यशस्वी ठरल्याची घोषणा करून संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. या लसीच्या माध्यमातून कोरोनामुळे त्रस्त असलेल्या जगाला दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण या लसीबाबत आता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डेली मेलने रशियाच्या अधिकृत कागदपत्रांच्या हवाल्याने रशियाने विकसित केलेल्या कोरोना लसीबाबत ही माहिती उघड केली आहे. त्यानुसार केवळ ३८ जणांवरच रशियाने विकसित केलेल्या कोरोनावरील या लसीची चाचणी करण्यात आली. तसेच या लसीचे अनेक दुष्परिणामही दिसून आल्याचा दावा डेलीमेलने आपल्या वृत्तात केला आहे. तसेच चाचणी केवळ ३८ जणांवर केल्यानंतर या लसीला मान्यता देण्यात आल्याचे डेलीमेलने या वृत्तात म्हटले आहे.

यासंदर्भात Fontanka या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अनेक दुष्परिणाम रशियन संशोधकांनी विकसित केलेल्या कोरोना लसीचे दिसून आले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेदना, स्वेलिंग, ताप असे परिणाम दिसून आले आहेत. तसेच ही लस ज्यांना देण्यात आली, त्यांच्यामध्ये कमकुवतपणा, शरीरात ऊर्जेची कमतरता, भूक न लागणे, डोकेदुखी, जुलाब, नाक कोंडणे, घसा खराब होणे आणि नाक गळणे अशी लक्षणे दिसून आली. केवळ ४२ दिवसांच्या संशोधनानंतर या लसीला रशियन अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यामुळे ही लस कितपत परिणामकारक आहे, हे समजू शकलेले नाही.

कुठलाही वैद्यकीय अभ्यास कोरोनाच्या साथीवरील या लसीच्या परिणामाबाबत झाला नसल्याचे या लसीची नोंदणी करताना दिलेल्या कागदपत्रात म्हटले होते. पण कोरोनावरील या लसीने आवश्यक त्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार केल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.

स्पुटनिक- व्ही असे रशियाने आपल्या या लसीचे नाव ठेवले असून अनेक देशांना या लसीचा पुरवठा करण्याची तयारी देखील रशियाकडून करण्यात आली आहे. पण रशियाने उचललेल्या या पावलावर जगभरातील अनेक संशोधकांनी टीका केली आहे. ही लस चुकीची किंवा धोकादायक ठरल्यास साथ अधिक गंभीर रूप धारण करू शकते, अशी भीती व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पुतीन यांनी कोरोनावरील ही लस घेतल्यानंतर आपल्या मुलीला काही काळासाठी केवळ सौम्य ताप आला होता, असे सांगितले. पण Fontanka या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार कोरोनावरील लसीचे दुष्परिणाम म्हणून अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. शरीरामध्ये या समस्यांची पुनरावृत्ती होते आणि अनेकवेळा त्या कायम राहतात.

याबाबतच्या अहवालानुसार या कोरोना लसीमुळे होणारे बहुतांश दुष्परिणाम आपोआप बरे झाले. पण संशोधनाच्या ४२ व्या दिवशीही दुष्परिणामांच्या ३१ घटना समोर आल्या होत्या. तसेच स्वयंसेवकांच्या शरीरामध्ये ही लस टोचल्यानंतर ४२ व्या दिवशीही अँटिबॉडीचे प्रमाण सामान्यच दिसून आले. दरम्यान, रशियाने विकसित केलेली कोरोनावरील लस १८ वर्षांपेक्षा कमी आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. कारण या लसीचा अशा व्यक्तींवर काय परिणाम होऊ शकतो, हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच ही लस गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनासुद्धा देण्यात येणार नाही. त्याचबरोबर ही लस आधीपासूनच अनेक व्याधींचा सामना करत असलेल्या व्यक्तींनाही देण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.