प्रामाणिक करदात्यांना उद्या ‘गूड न्यूज’ देणार पंतप्रधान


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या टॅक्स वेळेत भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी एक ‘गूड न्यूज’ देणार असून एक नवे व्यासपीठ केंद्र सरकारने प्रामाणिक करदात्यांसाठी तयार केले असून उद्या याची घोषणा पंतप्रधान मोदी करणार आहेत. या व्यासपीठाचे Transparent Taxation : Honouring the Honest असे नाव आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर हे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित असतील. त्याचबरोबर या कार्यक्रमात प्राप्तिकर विभागातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशिवाय विविध वाणिज्य विभाग, व्यापारी संघ, चार्टर्ड अकाउंटंट्सचे संघ सहभागी होणार आहेत.

पीएमओने दिलेल्या माहितीनुसार प्रामाणिक करदात्यांसाठी जे व्यासपीठ पंतप्रधान लॉन्च करणार आहेत. ते प्रत्यक्ष कर सुधारणांचा प्रवास आणखी पुढे घेऊन जाईल. गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष करांमध्ये अनेक प्रमुख आणि मोठी कर सुधारणा केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) लागू केली आहे. गेल्या वर्षी कॉर्पोरेट टॅक्सचे दर ३० टक्क्यांहून कमी होऊन २२ टक्के करण्यात आले आहेत. तसेच नव्या काही योजनांसाठी हा दर आणखी कमी करत १५ टक्के करण्यात आला. लांभांश वितरण कर देखील रद्द करण्यात आला. त्याचबरोबर करांचे दर कमी करणे आणि प्रत्यक्ष कर कायद्यांच्या सुलभीकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

सीबीडीटीद्वारे प्राप्तिकर विभागाच्या कामकाजात दक्षता आणि प्रादर्शकता आणण्यासाठी देखील अनेक गोष्टी समाविष्ठ करण्यात आल्या आहेत. प्राप्तिकर विभागाने प्रलंबित कर विवादांवर तोडग्यासाठी प्रत्यक्ष कर ‘विवाद से विश्वास अॅक्ट, २०२०’ देखील सादर केला आहे. ज्याद्वारे भविष्यात होणाऱ्या कर विवाद सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या संकट काळात करदात्यांसाठी कर प्रक्रिया सोपी करण्यासाठी देखील प्राप्तिकर विभागाने अनेक प्रकारचे प्रयत्न केले आहेत. ज्या अंतर्गत रिटर्न दाखल करण्याची वैधानिक वेळमर्यादा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर करदात्यांच्या हातात रोख रक्कमेचा प्रवाह वाढावा यासाठी वेगाने परतावे दिले जात असल्याचेही पीएमओने म्हटले आहे.