फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानी एकुलता एक भारतीय कलाकार


फोर्ब्ज कंपनी दरवर्षी जगभरातील कलाकारांच्या मिळकतीचे सर्वेक्षण करत असते. त्याप्रमाणे त्यांनी यंदा देखील सर्वेक्षण केले असून कोरोनाच्या संकटामुळे यंदा कलाकारांच्या मिळकतीत फरक पडेल असे अनेकांना वाटले. कारण चालू वर्ष कोरोनामुळे वाया गेले, कोणत्याही कलाकाराला काम नाही आणि त्यामुळे मानधनही नाही. पण सर्वेक्षणाच्या आधारे फोर्ब्जने जाहिर केलेले आकडे पाहून तुमचे देखील डोळे चक्रावतील. कारण या वर्षात मानधन मिळवत अभिनेता अक्षय कुमार भारतातील सर्वाधिक श्रीमंत कलाकार बनला आहे. या यादीत तो सहाव्या स्थानी आहे, तर पहिल्या स्थानी द रॉक आहे.

1 जून 2019 ते 1 जून 2020 या दरम्यान कलाकारांच्या मानधनाचे सर्वेक्षण केले, त्यात ही आकडेवारी समोर आली आहे. यात आलेल्या निष्कर्षानुसार डे्वन जॉन्सन (87.5), रेयान रेनॉल्डस (71.5), मार्क वॉहलबर्ग (58), बेन एफ्लेक (55), विन डिझेल (54), अक्षयकुमार (48.5), लीन मॅन्युअल मिरांडा (45.5), विल स्मिथ (45.5), एडम सँडलिअर (41) जॅकी चेन (40) यांचा यादीत समावेश आहे. (वरील आकडे हे मिलियन डॉलर्समध्ये आहेत)

या यादीत पहिल्या दहात असलेला अक्षय कुमार हा एकमेव भारतीय अभिनेता असल्यामुळे तो सध्या भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे, यात शंका नाही. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार 3 अब्ज 63 कोटी 3 लाख 46 हजार त्याचे उत्पन्न होते. या सर्वेक्षणसाठी त्याने केलेले करार, जाहिराती, चित्रपट या माध्यमातून आलेले पैसे येथे मोजले जातात.