शास्त्रज्ञांकडून रशियन लसीची ‘निष्काळजी आणि मूर्ख’पणाशी तुलना


गेली अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला अखेर अधिकृत मंजूरी दिली आहे. याबाबतची माहिती स्वतः रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी दिली. सोबतच या लसीचा डोस त्यांच्या मुलींना देखील देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या लसीला सोव्हियत सॅटेलाईटवरून स्पुटनिक व्ही असे नाव रशियाने दिले आहे.

या लसीसाठी रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडचे Kirill Dmitriyev यांनी निधी दिला असून त्यांनी सांगितले की, लवकरच लसीचे 3 टप्प्यातील ट्रायल सुरू होईल व सप्टेंबरमध्ये लसीचे उत्पादन सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर गमलेया इंस्टिट्यूटने बनवलेल्या या लसीमध्ये इतर देश देखील रस दाखवत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात 20 देशांनी 1 बिलियन पेक्षा अधिक डोसची मागणी केली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

पण दूसरीकडे कोरोनावर यशस्वी लस बनविल्याच्या रशियाच्या दाव्यावर वैज्ञानिकांनी जोरदार टीका केली आहे. रशियाच्या या प्रयोगाला तज्ज्ञांनी ‘निष्काळजी आणि मूर्ख’पणाचे वर्तन असे वर्णन केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे म्हणणे आहे की, या लसीची चाचणी घेण्यात आली असून, त्यांच्या मुलीलाही ही लस देण्यात आली आहे. रशियात मोठ्या प्रमाणात ऑक्टोबरपासून लोकांना या लसीचा डोस देण्यात येणार आहे. शास्त्रज्ञांचे म्हणण्यानुसार रशिया करत असलेले धाडस योग्य नाही. योग्यप्रकारे चाचणी न घेतलेल्या लसींचा लोकांवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

रशियन लसीला जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्यता दिलेली नाही. पण रशियाचा असा दावा आहे की, 20 देशांनी त्यांनी तयार केलेल्या लशीच्या लक्षावधी डोसची ऑर्डर दिली आहे. रशियाच्या या प्रयोगावर बोलताना युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे जीवशास्त्रज्ञ प्राध्यापक फ्रान्सोइस बॉलॉक्स म्हणाले की, रशियाचे हे पाऊल ‘बेदरकार आणि मूर्ख’पणाचे असून रशियन लशीचे दोन धोकादायक परिणाम होतील. एक म्हणजे याचा लोकसंख्येवर वाईट परिणाम होईल, दुसरे म्हणजे लस स्वीकारण्यास लोक घाबरतील.

मेट्रो डॉट कॉमच्या एका अहवालानुसार, साऊथॅम्प्टन विद्यापीठातील ग्लोबल हेल्थ रिसर्चर मिशेल हेड म्हणाले की, रशियन लस प्रत्यक्षात कशी आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कोणतीही लस मोहीम राबवण्यापूर्वी खरी माहिती जनतेसमोर ठेवणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून लोकांचा विश्वास वाढू शकेल.

तर नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि एपिडेमिओलॉजिस्ट कीथ नील म्हणाले की, ही लस काही लोकांवर केलेल्या चाचण्यांमधून सुरक्षित असल्याचे दिसून येते. पण संसर्ग रोखण्यासाठी जास्त मोठी चाचणी आवश्यक आहे. रशियाकडून जोपर्यंत विश्लेषणासाठी वैज्ञानिक कागदपत्रे प्रकाशित केली जात नाहीत, तोपर्यंत आम्ही त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही.

तसेच लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील रोगप्रतिकारकशास्त्राचे प्रोफेसर डेनी ऑल्टमन म्हणतात की, लस मंजूर करण्यासाठी निकष मूलत: पुरेसे उंचावलेले आहेत. लस जर सुरक्षित आणि प्रभावी नसेल तर सध्याची समस्या लक्षणीयरित्या वाढेल. आम्ही आशा करतो की, रशियाने लशीचे हे निकष पूर्ण केलेले असतील. त्याचबरोबर ब्रिटनमधील वारविक बिझिनेस स्कूलचे औषध संशोधनतज्ज्ञ इफर अली म्हणतात की, वेगवान मंजुरी म्हणजे लशीच्या संभाव्य दुष्परिणामांची चौकशी करणे बाकी आहे. लशीमध्ये जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा समान गोष्ट बर्‍याच वेळा घडतात, व्हायरस सहजपणे शरीरात प्रवेश करतो आणि त्या व्यक्तीस अधिक आजारी बनवतो.