भारताला कोरोना लस देणार रशिया ?, सेफ्टी डेटा देखील करणार जारी

रशियाने काल कोरोना प्रतिबंधक लसीला अधिकृत मंजूरी दिली होती. स्वतः रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर या लसीच्या रिसर्चसाठी फंडिंग करण्याऱ्या समुहाचे प्रमुख किरिल दमित्रिव्ह यांनी माहिती दिली की रशिया अन्य देशांना नोव्हेंबरपर्यंत लसीचा पुरवठा करू शकतो. त्यांनी माहिती दिली होती की भारतासह 20 देशांनी लस खरेदी करण्यास रस दाखवला आहे.

रशियाचे म्हणणे आहे की, ऑक्टोंबरपासून देशात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केला जाईल. मात्र रशियाच्या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अद्याप बाकी आहे. त्यामुळे जगभरातील तज्ञ या लसीला अद्याप यशस्वी मानत नाहीत. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचे परिणाम आल्यानंतरच या लसीबाबत दावा करता येईल.

दमित्रिव्ह म्हणाले की, ही लस सुरक्षित आहे. हे सिद्ध करण्यासाठी आम्ही ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये डेटा प्रकाशित करू. आतापर्यंत रशियाने लसीसंबंधित सायंटिफिक डेटा प्रकाशित केलेला नाही. दमित्रिव्ह यांनी माहिती दिली की, रशियातील लोकांना हळूहळू लस टोचली जाईल. एकाच वेळी आम्ही सगळ्यांना लस देणार नाही.

दमित्रिव्ह यांनी आपल्या लसीवर पुर्ण विश्वास दर्शवला आहे. त्यांनी स्वतः लस टोचली असल्याची माहिती दिली. त्यांनी दावा केला की, रशियाकडे आधीच अनेक देशांनी कोट्यावधी डोसची ऑर्डर केली आहे. ब्राझीलमधील एक राज्य देखील रशियासोबत करार करणार आहे. फिलिपाईन्सने देखील या लसीचे समर्थन केले आहे.