… म्हणून सौदी अरेबियाची माफी मागायला जाणार पाकिस्तानचे लष्करप्रमुख

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांच्या वक्तव्यांमुळे भडकलेल्या सौदी अरेबियाचा राग शांत करण्यासाठी आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा रियादचा दौरा करणार आहेत. बाजवा यांच्या दौऱ्याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दोन्ही देशांमधील तणाव एवढा वाढला आहे की सौदीच्या सरकारने पाकिस्तानसोबतचा 6.2 बिलियन डॉलर्सचा करार रद्द केला आहे व तेल-गॅस देण्यासही बंदी घातली आहे.

मागील आठवड्यात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सौदीच्या नेतृत्वाखालील ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फ्रेंस संघटनेला चेतावणी देत म्हटले होते की, परराष्ट्र मंत्र्यांची बैठक बोलविण्यात यावी. बैठक बोलवली नाही तर पंतप्रधान इम्रान खान यांना सांगेल की, अशा इस्लामिक राष्ट्रांची बैठक बोलविण्यात यावी, जे काश्मिर मुद्यावर आमचे समर्थन करतात. सौदी आयओसीला काश्मिर मुद्यावर भारताच्या विरोधात उभे राहू देत नाही. मात्र कुरेशी यांनी यानंतर दोन वेळा पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव स्पष्ट दिसत आहे.

लष्करप्रमुख बाजवा दोन्ही देशांमधील तणाव कमी करून, संबंध मजबूत करण्यासाठी सौदी अरेबियाला जाणार आहेत. जनरल बाजवा यांनी सौदीचे राजदूत नवाफ बिन सईद अल-मलिक यांची देखील भेट घेतली.