न्यूझीलंडचा कोरोनामुक्तिचा दावा फेल; आढळले 4 नवे रुग्ण, ऑकलंड पुन्हा लॉकडाऊन


ऑकलंड – मागील 100 दिवसात एकही कोरोनाबाधित न सापडल्यामुळे जगभरात न्यूझीलंडचे भरुभरुन कौतुक झाले, त्याचबरोबर कोरोना विरोधातील लढाईत विजय मिळवणार जगातील एकमेव देश असा बहुमान देखील मिळवला होता. पण अवघ्या दोन दिवसातच न्यूझीलंडचा कोरोनामुक्तीचा दावा फेल झाला असून न्यूझीलंडवर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढावले असून ऑकलंडमध्ये चार नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

याची घोषणा न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनीच केली असून त्यांनी सांगितले की, ऑकलंडच्या एका घरातील चार सदस्य अधिकाऱ्यांना कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांना कोरोना कसा झाला याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. देशात 102 दिवसांनंतर स्थानिक संक्रमण झाले आहे.

पंतप्रधान म्हणाल्या, बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत न्युझीलंडचे सर्वात मोठे शहर ऑकलंड तिसऱ्या टप्प्यातील अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ लोकांच्या घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. तसेच बार आणि अन्य अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात येणार असून तीन दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

दरम्यान या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार असून आम्ही याद्वारे त्या कुटुंबाला कोरोना एवढ्या कालावधीनंतर कसा झाला याचा शोध घेणार आहोत. ही माहिती गोळा करणे खूप कठीण आहे, हे माहिती असल्याचे त्या म्हणाल्या.

पीएम जेसिंडा यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या कालावधीनंतर कोरोनाचे रुग्ण पुन्हा सापडतील याची अपेक्षा नव्हती. पण त्यासाठी आम्ही तयारी केली होती. ऑकलंडमध्ये प्रवासावर प्रतिबंध लावण्यात आले असून जे लोक तिथे राहतात आणि घरी जात आहेत त्यांना अडविले जाणार नाही. लॉकडाऊन शुक्रवारपासून वाढविला जाईल. दुसऱ्या टप्प्यात समारंभांना 100 व्यक्तींना परवानगी दिली जाईल. त्यांना सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे.