संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; सुशांतच्या नातेवाईकाची कायदेशीर नोटीस


मुंबई – सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरुन राजकारणी, सेलिब्रेटी आणि प्रशासकीय व्यवस्था यांच्याकडून होत आहेत. या प्रकरणावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील अनेक दावे केले आहेत.

संजय राऊत यांनी नुकतेच सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केले असून सुशांतला त्यांचे दुसरे लग्न मान्य नसल्याचा दावा केला होता. सुशांतच्या चुलत भावाने त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली असल्याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांना सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांना ४८ तासात जाहीर माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा, असे नीरजने नोटीसमध्ये म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि त्याचे वडिल के. के. सिंह यांच्यातील नाते फारसे चांगले नसल्याचा दावा संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या स्तंभातून केला होता. संजय राऊत यांनी सुशांत आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे खूश नव्हता. सुशांत सिंह राजपूत किती वेळा आपल्या वडिलांची भेट घेण्यासाठी पाटण्याला गेला होता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागील सत्य बाहेर येऊ नये म्हणून यावर राजकारण करण्यात आले आणि मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण काढून घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. पण हे सर्व आरोप सुशांतच्या कुटुबियांकडून फेटाळण्यात आले होते.