गुगलला चकमा देत टीक-टॉकने चोरी केली युजर्सची महत्त्वाची माहिती

चीनी शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप मागील अनेक दिवसांपासून वादात आहे. भारताने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडत या अ‍ॅपवर बंदी घातली. आता टीक-टॉकने कथितरित्या मागील 15 महिने अँड्राईड युजर्सच्या मोबाईलचे यूनिक आयडेंटिफायर्स जमा केल्याची माहिती समोर आली आहे. या यूनिक आयडेंटिफायर्स ज्याला मीडिया एक्सेस कंट्रोल (मॅक) देखील म्हटले जाते. खासकरून वैयक्तिक जाहिराती प्रस्तुत करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

अँड्रॉईड युजर्सचे मॅक एकत्र करून टीक-टॉकने गुगलच्या पॉलिसीचे उल्लंघन केले आहे. बाइटडान्सच्या मालकीच्या या अ‍ॅपने 18 नोव्हेंबरला एक अपडेट जारी करत 15 महिन्यानंतर ही माहिती चोरी करणे थांबवले होते.

अ‍ॅपलने 2013 साली थर्ड पार्टी अ‍ॅप डेव्हलपर्सला आयफोन युजर्सचे मॅक अ‍ॅड्रेस एकत्र करण्यापासून रोखले होते. 2015 मध्ये गुगलने देखील याचेच अनुसरण करत मॅक अ‍ॅड्रेस, आयएमईआयसह आयडेंटिफायर्स जमा करण्यास प्रतिबंध घातले होते. मात्र टीक-टॉकने मात्र गुगलच्या प्रतिबंध न पाळत गुप्तरित्या आपली रणनिती आखत ही माहिती चोरी केली. गुगलला देखील चकमा देत टीक-टॉकने ही माहिती एकत्र केली आहे.

भारताने सुरक्षेचा मुद्दा मांडत या अ‍ॅपवर बंदी घातली होती. अमेरिका देखील अ‍ॅप विरोधात पाऊल उचलणार आहे. अशा स्थितीमध्ये ही माहिती समोर आल्याने याला विशेष महत्त्व आहे.