जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना’ अडकला वादात, हवाई दलाने घेतला आक्षेप

अभिनेत्री जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल हा चित्रपट आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. मात्र रिलीजच्या दिवशीच हा चित्रपट वादात अडकला आहे. भारतीय हवाई दलाने सेंसर बोर्डाला पत्र लिहिले असून, हवाई दलाने या चित्रपटाबाबत आक्षेप दर्शवला आहे. हवाई दलानुसार, चित्रपटात आयएएफची नकारात्मक प्रतिमा दाखवण्यात आली आहे. यातील काही दृष्यांवर आक्षेप घेत आयएएफने सेंसर बोर्डला पत्र लिहिले आहे. पत्रात आयएएफने नेटफ्लिक्स आणि धर्मा प्रोडक्शनवर हवाई दलाची प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला आहे.

आयएएफने सेंसर बोर्डाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, धर्मा प्रोडक्शनने प्रामणिकतेने भारतीय हवाई दलाचे प्रतिनिधित्व करण्यास सहमती दर्शवली होती व हे सुनिश्चित केले होते की चित्रपट पुढील पिढीला प्रेरित करण्यासाटी मदत करेल. मात्र ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अंदाज लावता येत आहे की चित्रपटातील काही दृष्य आणि संवाद भारतीय हवाई दलाची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने दाखवत आहे.

चित्रपटात महिलांना हवाई दलात देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल आयएएफने म्हटले की, आमचे संघटन लिंगभेद करत नाही. भारतीय हवाई दल पुरुष आणि महिलांना समान संधी देते. हवाई दलाने चित्रपटातील काही दृष्य हटविण्याची मागणी देखील केली आहे.

दरम्यान, आज नेटप्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झाला असून, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.