फेसबुक पोस्टमुळे बंगळुरूमध्ये हिंसाचार, आरोपींकडूनच करणार नुकसान भरपाई

एका फेसबुक पोस्टमुळे बंगळुरूमध्ये भडकलेल्या हिंसाचार प्रकरणात आता राज्य सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. या हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई या घटनेस जबाबदार असलेल्यांकडून केली बंगळुरूमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेक कार आणि बस जाळण्यात आल्या होत्या. राज्य सरकार हिंसा करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्याकडून नुकसान भरपाई करणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आलेले आहे.

कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय आणि सर्व राज्यांच्या दिशानिर्देशानुसार हिंसाचारामुळे जेथे सार्वजनिक नुकसान झाले आहे, तेथील भरपाई त्याच आरोपींकडून केली जाईल. आम्ही त्या व्यक्तींची ओळख पटवू व नुकसान किती झाले आहे याची पाहणी करू. माझे काम खऱ्या दोषींना पकडणे असून, त्यांना शिक्षा दिली जाईल.

बंगळुरूमधील हिंसाचारावर कर्नाटकचे मंत्री सीटी रवि म्हणाले की, हिसांचार पसरवण्याची सुनियोजित योजना होती. संपत्तीचे नुकसान व्हावे यासाठी पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा वापर करण्यात आला. जवळपास 300 वाहने जाळण्यात आली. आमच्याकडे संशयित आहेत, मात्र तपासणीनंतरच पुष्टी होईल. उत्तर प्रदेशमध्ये जसे आरोपींकडून संपत्ती वसूल करण्यात आली होती, तसेच आम्ही करू.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकच्या बंगळुरू येथील जीडे हल्ली भागात मंगळवारी रात्री 9.30 वाजता काही लोकांनी काँग्रेस आमदार श्रीनिवास मुर्ती यांच्या घरावर हल्ला केला. घराला आग देखील लावण्यात आली. आमदार श्रीनिवास यांच्या भाच्याने सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट शेअर केली होती. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. आमदारच्या घराला निशाणा बनवल्यानंतर पोलीस स्टेशनवर देखील हल्ला करण्यात आला. या घटनते अ‍ॅडिशनल पोलीस कमिश्नरसह 60 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.