1000 कोटींच्या हवाला रॅकेटचे चीन कनेक्शन, आयकर विभागाची धाड

चीनच्या नागरिकाद्वारे भारतातून राहून चालवल्या जाणाऱ्या हवाला व्यवहाराबाबत अनेक खुलासे झाले आहेत. आयकर विभागाच्या टीमने केलेल्या छापेमारीमध्ये जवळपास 1000 कोटी रुपयांच्या हवाला व्यवसाय उघडकीस आला आहे. गुप्तचर संस्थेला मिळालेल्या माहितीच्या आधारावर आयकर विभागाच्या टीमने दिल्ली, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये जवळपास 21 ठिकाणांवर छापा टाकला. आतापर्यंत विभागाला 300 कोटींच्या हवाला व्यवहाराची माहिती मिळाली असून, विभागानुसार ही रक्कम 1 हजार कोटींपेक्षा अधिक असू शकते.

चीनी नागरिक असलेला लोउ सांग भारतात आपली ओळख बदलून राहत होता. त्याने मणिपूरच्या एका मुलीशी लग्न देखील केले आहे. सांग भारतात चार्ली पँग बनून भारतीय नागरिक असल्याचे भासवत होता. त्याच्याकडे भारताचे बनवाट पासपोर्ट आणि आधारक कार्ड देखील आढळले आहे.

हवालाद्वारे तो दररोज 3 कोटी रुपये काढत असे. यात त्याची मदत बंधन बँक आणि आयसीआयसीआयचे अधिकारी करत असे. या चीनी आरोपीचे 40 बनावट बँक खाती होती. आयकर विभागाने छापेमारीमध्ये बँक अधिकाऱ्यांच्या येथे देखील छापा टाकला.

हा घोटाळा जवळपास 3 वर्षांपासून सुरू होता, ज्यात अनेक बनावट कंपन्या बनवण्यात आल्या. हा घोटाळा 1000 कोटींपेक्षाही अधिकचा आहे. चीनी आरोपी आपला वारंवार पत्ता बदलत असे. तो आधी दिल्लीच्या द्वारका येथे थांबला होता आणि त्यानंतर डीएलएफ भागात राहत होता. यात केवळ चीनी पैसेच नाहीतर, हाँगकाँग, अमेरिकन डॉलर्सचा देखील घोटाळा सुरू होता.